पालिकेचा वसुली विभाग अॅक्टीव्ह मोडवर
सातारा :
सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिलेल्या आदेशानुसार सातारा नगरपालिकेचे वसुली विभाग प्रमुख उमेश महादार यांच्या नेतृत्वाखाली वसुली पथके अॅक्टीव्ह झाली आहेत. मंगळवारी एका दिवसात सहा मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे. तसेच शासकीय थकबाकीदारांनाही त्या त्या कार्यालयात जाऊन विभागाप्रमुखांना नोटीस बजावण्याचे सत्र सुरु केले आहे. अगदी सातारा जिल्हा परिषदेच्या काही विभागांनाही थकबाकीच्या नोटीसा सातारा पालिकेने बजावल्या गेल्याचा प्रकार निदर्शनास आलेला आहे.
कसल्याही परिस्थितीत करांचा भरणा मार्च एण्डपूर्वी करावा, असे आवाहन सतत सातारा पालिका करते आहे. तरीही काही नागरिक कर भरण्याकडे दुर्लक्ष करत असतात. सातारा नगरपालिकेच्यावतीने मुख्याधिकारी अभिजित बापट हे सतत वसुली विभागाला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना करत आहेत. वसुली विभागाने त्याकरता प्रत्येक विभागानिहाय पथकाची नियुक्ती केली आहे. त्या पथकांच्या माध्यमातून प्रत्येक वॉर्डात कोण कोण थकबाकीदार आहे, त्यांना नोटीस बजावण्याचे काम सुरु केले आहे. त्याचबरोबर शहरातील काही शासकीय कार्यालयाकडून करांचा भरणा केला नाही, त्या करदात्यांनाही नोटीस बजावण्याकरता सातारा पालिकेचे कर्मचारी त्या विभागाच्या प्रमुखानां भेटून नोटीस देत आहेत. त्यामुळे वसुली विभाग अॅक्टीव्ह झालेला आहे. सातारा पालिकेच्या वसुली विभागाचे कर अधिकारी अनिल महादार यांच्या नेतृत्वाखाली लिपीक राजाराम लगड, मिलिंद सहस्त्रबुद्धे, जगदीश मुळे, उत्तम कोळी, तुषार माहुलकर, तेजस साखरे, रवी भाग्यवंत, गणेश पवार, भारत चौधरी, पियुष यादव यांनी रविवार पेठेतील शाहू क्रीडा संकुलातील वृषाली साळी यांचे 4 गाळे सील केले आहेत. त्यांची थकबाकी 12 लाख 10 हजार 605 रुपये आहे. तसेच बाजार गावठाण येथील प्रमोद चक्के यांच्या दोन मिळकती सील केल्या असून त्यांच्याकडून एका मिळकतीचे 4 लाख 26 हजार 514 रुपये तर एका मिळकतीसाठी 5 लाख 60 हजार 802 रुपये एवढी थकबाकी हाती. ही कारवाई वॉरंट अधिकारी अतुल दिसले, वरीष्ठ लिपीक गणेश तालीम, अक्षय कोळपे, मुकेश वायदंडे, विजय पवार यांनी केली.