कर थकबाकीदारांविरुद्ध मनपाची धडक कारवाई
कामत रेस्टॉरंटला ठोकले सील : इतरांवरही कारवाई करणार : शंभर टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांना चांगलाच दणका दिला आहे. गुरुवारी महसूल विभागाने मारुती गल्ली येथील कामत रेस्टॉरंटला 11 लाख रुपयांची थकबाकी असल्याबद्दल सील ठोकले. मालमत्ता कर न भरल्यामुळे या हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढे इतर थकबाकीदारांवरही कडक कारवाई करण्याचा इशारा महसूल उपायुक्तांनी दिला आहे. महानगरपालिकेकडून वेळोवेळी मालमत्ता तसेच इतर कर भरण्याच्या सूचना करून देखील दुर्लक्ष होत होते. दोन दिवसांपूर्वीच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत थकबाकीदारांना इशारा देण्यात आला होता. कोणत्याही परिस्थितीत शंभर टक्के वसुली करण्याचे उद्दिष्ट महसूल विभागाला देण्यात आल्याने गुरुवारपासून कारवाईला सुरुवात करण्यात आली. कामत हॉटेलला अनेक वेळा नोटीस बजावूनही त्यांनी मालमत्ता कर भरला नव्हता. तब्बल 11 लाख रुपये मालमत्ता कर थकल्याने अखेर गुरुवारी महसूल उपायुक्त रेश्मा तालीकोटी यांच्या उपस्थितीत हॉटेलला सील ठोकले. सध्या महापालिकेकडून करवसुलीची मोहीम आखण्यात आली असून थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
आतापर्यंत 62 टक्के करवसुली
नागरिकांनी थकित मालमत्ता कर भरावा, अशी वेळोवेळी विनंती करून देखील अद्याप काही मालमत्ताधारकांनी कर भरलेला नाही. अशा मालमत्ताधारकांवर कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत 62 टक्के करवसुली झाली असून उर्वरित करवसुली येत्या महिनाभरात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कामत रेस्टॉरंटने 11 लाख रुपयांचा मालमत्ता कर थकविल्याने कारवाई करण्यात आली.
-रेश्मा तालीकोटी (महसूल उपायुक्त, मनपा)