कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शेतकऱ्यांना अधिक नुकसानभरपाईसाठी मनपात ठराव

09:59 AM Nov 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हलग्याच्या शेतकऱ्यांचे विशेष प्रकरण म्हणून प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय

Advertisement

बेळगाव : हलगा येथील सांडपाणी प्रकल्पाला जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई देण्याबाबत बुधवारी झालेल्या महापालिकेच्या सभागृहामध्ये ठराव करण्यात आला. विशेष प्रकरण म्हणून सरकारकडे हा प्रस्ताव पाठविण्याचे ठरविण्यात आले. सर्व नगरसेवकांनी त्याला पाठिंबा दिला. एकजुटीने या ठरावाला नगरसेवकांनी मंजुरी दिल्यामुळे हलगा येथील सांडपाणी प्रकल्पाला जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना अधिक नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हलगा येथील सांडपाणी प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची 19 एकर 9 गुंठे जमीन घेण्यात आली. येथील 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. शेतकऱ्यांना केवळ 3 लाख 63 हजार रुपये एकरी नुकसानभरपाई मंजूर केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ती नुकसानभरपाई स्वीकारली नाही. किमान 30 ते 40 लाख रुपये एकरी नुकसानभरपाई दिली पाहिजे. त्यासाठी जास्तीतजास्त नुकसानभरपाई द्यावी, असा ठराव सभागृहात करण्यात आला. आमदार राजू सेठ यांनीही याबाबत सरकारकडे योग्य तो पाठपुरावा करू, असे आश्वासन सभागृहात दिले. शेतकऱ्यांनी जमीन दिली आहे. त्यामुळे त्यांना योग्य नुकसानभरपाई देणे हे साऱ्यांचेच कर्तव्य आहे. 2013 मध्ये सदर जमीन घेण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने स्थगिती दिली होती. मात्र 2017 ला न्यायालयाने  स्थगिती उठविली होती. त्यानंतर ही जमीन कब्जात घेऊन काम सुरू करण्यात आल्याची माहिती उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांनी सभागृहात दिली. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वांनीच एकजुटीने प्रयत्न करू, असे सर्वच नगरसेवकांनी यावेळी सांगितले. त्यामुळे याबाबतचा ठराव करून तो सरकारकडे पाठविला जाणार आहे.

Advertisement

निधीबाबत झाली चर्चा

14 व 15 व्या वित्त आयोगाबाबत सभागृहामध्ये जोरदार चर्चा झाली. सध्या महापालिकेकडे 24 कोटी 55 लाख रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागाला 11 लाख रुपये विविध विकासकामांसाठी दिले जातील, असे अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी सांगितले. सदर निधी राखीव असून तो 14 व्या वित्त आयोगातून खर्च केला जाईल, असे सांगण्यात आले. यावेळी नगरसेवकांनी तातडीने निधी उपलब्ध करावा, अनेक कामे प्रलंबित आहेत. ती कामे पूर्ण करावीत, अशी मागणी केली. केवळ आश्वासन देऊन चालणार नाही तर निधी शिल्लक असेल तर तो विविध कामांसाठी खर्च करावा, असे सांगण्यात आले.

मारहाण घटनेच्या विरोधात धरणे

बुधवारी सर्वसाधारण सभा होण्यापूर्वीच सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर काहीवेळ धरणे आंदोलन छेडले. मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. याचबरोबर आम्हाला संरक्षण द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सत्ताधारी गटाचे गटनेते राजशेखर डोणी यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी दंडाला काळ्याफिती बांधून निषेधही नोंदविण्यात आला. या धरणे आंदोलनामध्ये सत्ताधारी गटातील नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या.

नियमानुसारच सफाई कंत्राटदारांना टेंडर द्या

शहरातील स्वच्छतेसाठी नव्याने निविदा मागविण्यात येत आहेत. त्याबाबत अधिकाऱ्यांनी सभागृहात माहिती द्यावी, अशी मागणी नगरसेवक रवी साळुंखे यांनी केली. त्यावर सध्या जिल्हाधिकाऱ्यांकडे ही प्रक्रिया सुरू असून लवकरच नव्याने सफाई कंत्राटदारांना टेंडर दिले जाणार असल्याचे सांगितले. यावेळी रवी साळुंखे यांनी नियमानुसारच काम करणाऱ्या कंत्राटदारांना टेंडर द्यावे. जे कंत्राटदार काम नियमानुसार करत नाहीत, त्यांना पुन्हा टेंडर देऊ नये, असे सांगितले.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article