मनपा शाळा होणार 'मॉडेल स्कूल'
सांगली :
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका हद्दीतील महापालिकेच्या मालकीच्या ३९ शाळा 'मॉडेल स्कूल' म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनपा आयुक्त सत्यम गांधी यांच्या पुढाकाराने या शाळांच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. एकूण ४ कोटी ७५ लाख ५२ हजारांचा निधी याकामी मंजूर करण्यात आला आहे.
शाळा क्रमांक १७, २६, २३, २९ (सांगली) आणि १९, २२ (मिरज) या सहा शाळांची निवड 'मॉडेल स्कूल' म्हणून करण्यात आली आहे, अशी माहिती शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
या दुरुस्ती कामांमध्ये इमारतींच्या गळती प्रतिबंधासाठी उपाययोजना, शौचालयांची दुरुस्ती किंवा नवीन बांधकाम, फरशी दुरुस्ती, रंगरंगोटी, खेळाच्या मैदानांचे नूतनीकरण इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. कामांची प्रक्रिया लवकरच निविदा मार्गे सुरू होणार आहे.
महापालिका शाळांची स्थिती गेल्या काही वर्षापासून मनपाच्या शाळांकडे प्रचंड दुर्लक्ष झाल्याचे चित्र होते. शिक्षकांची संख्या कमी असणे, शैक्षणिक कामांऐवजी अन्य कामांमध्ये त्यांना गुंतवले जाणे, शाळांतील पायाभूत सुविधांची वानवा आणि प्रशासनाच्या अनियमिततेमुळे विद्यार्थी संख्याही घटली. आहे. एकेकाळी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकणाऱ्या महापालिकेच्या शाळांचा दर्जा अलीकडे घसरलेला होता.
- 'मॉडेल स्कूल' योजनेचे उद्दिष्ट
महापालिकेच्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा उद्देश ठेवून ही योजना राबवण्यात येत आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये मॉडेल स्कूल उपक्रमाला मिळालेल्या यशानंतर आता महापालिकाही हाच मार्ग अवलंबते आहे. या शाळांमध्ये डिजिटल शिक्षण, स्वच्छ आणि सुरक्षित वर्गखोल्या, खेळाचे साहित्य, आधुनिक शिक्षण साधने, पुस्तकालय, संगणक कक्ष यांचा समावेश असेल.
- आयुक्त सत्यम गांधी यांचा दृष्टिकोन
सामान्य व वंचित वर्गातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने आयुक्त सत्यम गांधी यांनी स्वतः शाळांची पाहणी करून, सुधारणा प्रस्ताव मांडले आणि मंजुरी दिली. त्यांच्या पुढाकारामुळे प्रशासनातील असंवेदनशीलतेला झटका बसला असून शहरात सकारात्मकता निर्माण झाली आहे.