मनपा अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या प्रभाग क्रं. 1 मधील समस्या
रहिवाशांनी वाचला समस्यांचा पाढा
बेळगाव : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मधील विविध समस्यांची पाहणी करून त्या सोडविण्यासाठी शनिवार दि. 1 रोजी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी तेथील रहिवाशांनी गटारी व रस्त्यासह विविध समस्यांचा पाढा वाचला. महानगरपालिकेच्या व्याप्तीत येणाऱ्या 58 प्रभागातील विविध समस्या जाणून घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मनपाचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी विविध ठिकाणी भेटी देऊन समस्यांची पाहणी केली जात आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये आज महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी फेरफटका मारून नागरिकांकडून समस्या जाणून घेतल्या. खडेबाजार, खंजर गल्ली, भोई गल्ली, दरबार गल्ली, जालगार गल्लीत अधिकांनी फेरफटका मारून पाहणी करण्यात आली. दरवषी पावसाळ्यात भोई गल्लीत रस्त्यावरच पाणी साचते. त्यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वी समस्या सोडविण्यात येईल, असे अधिकाऱ्यानी यावेळी सांगितले. तसेच 24 तास पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन घालण्यासाठी एलअँडटीकडून रस्त्यांची खोदाई केल्याने समस्या निर्माण झाली आहे. त्याची देखील यावेळी पाहणी करून समस्या सोडविण्यासंदर्भात आश्वासन देण्यात आले.