संभाजी गल्ली येथील समस्यांची मनपा अधिकाऱ्यांकडून पाहणी
बेळगाव : महापालिकेच्या अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर व मनपा अधिकाऱ्यांनी प्रभाग क्र. 10 मध्ये येणाऱ्या संभाजी गल्ली येथे पाहणी दौरा करून तेथील समस्यांची माहिती घेतली आहे. यावेळी तेथील नाला, ड्रेनेज लाईन व जुन्या नाल्यासंदर्भात स्थानिक रहिवाशांनी समस्या अधिकाऱ्यांना सांगितल्या. यावर तातडीने तोडगा काढला जाईल, असे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिले. गेल्या काही वर्षांपासून संभाजी गल्ली येथे नाला व ड्रेनेज लाईनची समस्या कायम आहे. त्यामुळे येथील समस्या सोडवाव्यात, अशी मागणी रहिवाशांकडून नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्याकडे केली जात होती. याबाबत त्यांनी महापालिकेकडे पाठपुरावा चालविला होता. त्यानुसार अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर व मनपा अधिकाऱ्यांनी समस्या जाणून घेतल्या. यावेळी नगरसेविका वैशाली भातकांडे, अक्षता अडगुडकर, कपिल देसाई, सिद्धार्थ भातकांडे तसेच गल्लीतील महिला व नागरिक उपस्थित होते.