For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनपाचे कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त

09:59 AM Mar 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
मनपाचे कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त
Advertisement

कामावर परिणाम : नागरिकांनाही मारावे लागताहेत हेलपाटे

Advertisement

बेळगाव : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महानगरपालिकेतील कर्मचारीही निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेतील इतर कामांवर त्याचा परिणाम होत आहे. नागरिकांची कामेही प्रलंबित ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांना महानगरपालिकेचे हेलपाटे मारावे लागत आहेत. महानगरपालिकेतील महसूल विभागाला कर जमा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र या कामामुळे ते उद्दिष्ट पूर्ण करणे अशक्य झाले आहे. मार्चअखेरपर्यंत असलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेच्या महसूल निरीक्षकांनी प्रयत्न सुरू केले होते. मात्र निवडणूक जाहीर झाल्यानंतर घरोघरी जाऊन महसूल गोळा करणे अशक्य झाले आहे. याचबरोबर इतर कामांचाही ताण पडू लागला आहे. महानगरपालिकेतील नूतन इमारतीमध्ये निवडणुकीसंदर्भातील कामांसाठी कार्यालय थाटण्यात आले आहे. त्याच ठिकाणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवसभर ताटकळत थांबावे लागत आहे. मतदार याद्या तयार करणे, मतदारांची नावे नोंद करून घेणे, यासह इतर कामे त्या कर्मचाऱ्यांना लावण्यात आली आहेत. त्यामुळे मुख्य कार्यालयातील विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. परिणामी कामानिमित्त गेलेल्या नागरिकांना रिकाम्या हाती माघारी फिरावे लागत आहे. मनपा आयुक्त पी. एन. लोकेश हे देखील निवडणुकीच्या कामामध्ये गुंतले आहेत. निवडणूक अधिकारी म्हणून ते देखील विविध ठिकाणी भेटी देत आहेत. तसेच कर्मचाऱ्यांच्या बैठकादेखील घेऊन मार्गदर्शन करत आहेत. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती करण्याबबात ते प्रयत्न करत आहेत. एकूणच महानगरपालिकेतील सर्वच अधिकारी या कामामध्ये गुंतल्याने महानगरपालिकेतील कार्यालयांमध्ये शुकशुकाट पसरला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.