For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महापालिका निवडणूक अंतिम लढाई

06:01 AM May 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
महापालिका निवडणूक अंतिम लढाई
Advertisement

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचा अंतिम सामना असणार आहे. मुंबईत उध्दव ठाकरे यांची तर मुंबई आणि ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची खरी कसोटी असणार आहे, ठाणे आणि कल्याण महापालिकेत एकनाथ शिंदे यांना भाजपचे आव्हान असणार आहे. तर मुंबईत उध्दव ठाकरे यांच्यासमोर भाजप आणि एकनाथ शिंदे यांचे मोठे आव्हान असणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही, मुंबई आणि ठाणे तसेच कल्याण-डोंबिवली या शहरात मनसे फॅक्टर देखील तितकाच महत्त्वाचा असणार आहे. ठाकरे बंधुसाठी आपले वर्चस्व टिकवण्यासाठी एकत्र येणे हाच एकमेव पर्याय सध्याची राजकीय परिस्थिती बघता त्यांच्याकडे असू शकतो.

Advertisement

6 मे ला सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकासंदर्भात महत्त्वाचा आदेश दिला, येत्या चार आठवड्यात निवडणूक प्रक्रिया सुरू करा असे निर्देश देखील न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे नगरसेवकपदासाठी इच्छुक आणि उत्सुक असलेल्यांची लगबग सुरू झाली आहे. मतदार संघ आरक्षित झालाच तर आपला नंबर लागू शकतो, या आशेपोटी एकाच मतदार संघातील स्त्राr-पुरूष अशा किमान पाच इच्छुकांनी आपले जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्याची तयारी केली आहे.

मुंबई आणि ठाणे महापालिका या राज्याच्या उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन माजी मुख्यमंत्र्यांसाठी महत्त्वाच्या मानल्या जातात, एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बालेकिल्ला समजला जातो. मात्र आता ठाण्यात शिंदेंसमोर भाजपचे मोठे आव्हान असणार आहे. भाजपने ठाण्यात ऑपरेशन लोटस राबवत शिंदेंना घरच्या मैदानात घेरण्याची रणनिती आखली आहे तर भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात येऊन जनता दरबार घेतल्याने शिवसेनेची झोप उडाली आहे. ठाण्यात भाजपने कामाचा धडाका लावला आहे, तर कल्याण-डोंबिवलीत भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी ऑपरेशन लोटसचे नियोजन करताना सध्या भुल देण्यास सुरूवात केली आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या भूमिकेला प्राधान्य द्यावे लागते, त्यामुळे तेथील परिस्थिती बघुन युतीबाबतचा निर्णय होईल असे वक्तव्य केले.

Advertisement

मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यभर आपले वर्चस्व सिध्द करण्यासाठी प्रयत्न करणार हे नक्की, भाजपात सध्या इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे निवडणूकपूर्व युतीपेक्षा निवडणुकीनंतरच्या युतीवर भाजपचा भर असणार हे सांगायला नको. भाजप जर स्वतंत्र लढली तर त्याचा सगळ्यात मोठा फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसणार हे नक्की, मुंबईत अजुनही शिंदे यांच्या शिवसेनेला म्हणावी तशी पकड घेता आलेली नाही. उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आमदार-खासदार यांनी पक्ष सोडल्यानंतरही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे यांनी शिंदे यांच्यापेक्षा आपले वर्चस्व सिध्द केले.

शिवसेना ठाकरे गटाने देखील शनिवारी मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची बैठक बोलावून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकासंदर्भात 19 जुनपर्यंत अहवाल देण्यास सांगितले आहे. या अहवालामध्ये निवडणूका लढविताना स्थानिक पातळीवर कोणासोबत युती करावी तसेच काय काय पर्याय तपासता येतील, याबाबतची माहिती देण्यास नेत्यांना सांगितले आहे. मुंबईत ऑपरेशन सिंदूरच्या जल्लोषासाठी तिरंगा रॅलीचे मोठे आयोजन केले जात आहे, त्यात भाजपचे आमदार आणि नेते आघाडीवर असल्याचे दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक पातळीवरील नेते पण भाजपच्या तिरंगा

रॅलीत सहभागी होत आहेत. कारण उद्या युती झाली तर शिवसेना शिंदे गटाकडून तिकीट मिळेलच, पण भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले तर काही नगरसेवकांनी भाजपचा पर्याय खुला ठेवला आहे. विधानसभा निवडणुकीला ज्या पध्दतीने मुरजी पटेल, शायना एनसी हे भाजपचे उमेदवार शिवसेनेच्या तिकीटावर लढले, तसेच महापालिका निवडणुकीला होऊ शकते.

भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला ज्या पध्दतीने एकनाथ शिंदे यांचा वापर कऊन उध्दव ठाकरे यांना शह दिला. त्याचप्रकारे महापालिका निवडणुकीत शिंदेंचा कसा वापर करता येईल याचा देखील भाजपकडून अभ्यास सुरू आहे. मुंबईत 1985 पासून शिवसेनेचे वर्चस्व आहे. भाजपचा मुंबई महापालिकेत एकदाही महापौर झालेला नाही, ठाकरे यांच्या शिवसेनेतील पालिका निवडणुकीतील स्टार सगळेच शिंदे गटात दाखल झाले आहेत. दर आठवड्यात ठाकरे यांच्या शिवसेनेतील एक मोठा नेता शिंदे गटात दाखल होत आहे, माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या स्नुषा माजी नगरसेविका तेजस्वीनी घोसाळकर या देखील शिंदे गटाच्या वाटेवर होत्या. मात्र उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांचे सध्या तरी मन परिवर्तन झाले आहे. महाविकास आघाडीत मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी दिसत नाही. ठाकरे हे स्वतंत्र लढण्याच्या तयारीत असल्याचे सध्या तरी दिसत नाही. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ठाकरे यांच्या शिवसेनेचा काँग्रेसला मुंबईत फायदा झाला.

पुनम महाजन खासदार असलेल्या मतदार संघातून शिवसेनेमुळे भाजपच्या अॅड. उज्ज्वल निकम यांचा शेवटच्या क्षणी पराभव कऊन वर्षा गायकवाड खासदार झाल्या. मात्र लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाने हुरळून गेलेल्या काँग्रेसने विधानसभा निवडणूकीपूर्वी मुख्यमंत्री पदाबाबत तसेच जागा वाटपात शिवसेनेला चेपल्याने शिवसेना आता त्याचा वचपा काढणार, ठाकरे गटाने मुंबई महापालिका महाविकास आघाडीत न लढण्याची घोषणा केली.

आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर जाऊन उध्दव ठाकरे यांची भेट घेत, काँग्रेस शिवसेनेसोबत असल्याचे जरी सांगितले असले तरी ठाकरे महापालिका निवडणुकीत काँग्रेसला सोबत घेणार का? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. मे च्या अखेरपर्यंत महायुती आणि महाआघाडी यांच्यातील युतीबाबत बोलणी सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांसाठी निर्वाणीचा लढा असणार आहे.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :

.