महायुती की स्वबळाचा नारा ? निर्णय गुलदस्त्यात
इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली
सावंतवाडी
प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी ,वेंगुर्ले, मालवण या नगरपालिका व कणकवली नगरपंचायत निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये भाजप व शिवसेना महायुतीने निवडणूक लढवण्याचा सूर आळवला आहे. उद्या 13 नोव्हेंबरपर्यंत निर्णय निश्चित होणार आहे. परंतु भाजपने आपल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज सिंधुदुर्गनगरी येथे पालकमंत्री नितेश राणे , भाजपचे निवडणूक निरीक्षक माजी आमदार प्रमोद जठार, श्री दळवी , जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत मुलाखती सुरू आहेत. सावंतवाडी नगरपालिकेसाठी जवळपास पन्नास हुन अधिक जण मुलाखतीसाठी गेले आहेत . सावंतवाडी नगरपालिकेची जबाबदारी भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्यावर देण्यात आली असून त्यांनी सर्व इच्छुक उमेदवारांना एकत्र वाहनाने मुलाखतीसाठी ओरोस येथे नेले आहे. नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज झाल्या असून एकंदरीत भाजपने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज घेतल्यानंतर आता महायुतीने निवडणूक लढवायच्या की स्वतंत्र निवडणूक लढवायची हा निर्णय आजपर्यंत होऊन उद्या उमेदवारी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आज मुलाखती दिल्यानंतर आपल्याला उमेदवारी मिळणार का याची धाकधूक वाढली आहे. शिवसेना पक्षाचे इच्छुक उमेदवार उमेदवारी अर्ज भरण्याच्या दृष्टीने.तयारीला लागले आहेत. आमदार दीपक केसरकर आज दिवसभर आपल्या निवासस्थानी शांतच होते. महायुती होणार या आशेवरती ते सध्या असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे .