मनपाच्या अत्याधुनिक शववाहिका पडल्या धूळखात
जुन्याच शववाहिकांचा महापालिकेकडून वापर
बेळगाव : महानगरपालिकेकडून लाखो रुपयांचा निधी खर्ची घालून अत्याधुनिक दोन शववाहिका खरेदी करण्यात आल्या आहेत. सदर शववाहिकांचे केवळ लोकार्पण करण्यात आले असून प्रत्यक्षात त्यांचा वापर सुरू नसल्याने शववाहिका सदाशिवनगर येथील स्मशानभूमीच्या आवारात धूळखात पडल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार सदर शववाहिकांचे रजिस्ट्रेशन झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. महानगरपालिकेच्या ताफ्यात असलेल्या शववाहिका नादुरुस्त होत असल्याने म्हैसूर मॉडेलच्या शववाहिका बेळगावात सुरू करण्याचा निर्णय माजी आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष श्ा़dरीशैल कांबळे यांच्या कार्यकाळात घेण्यात आला होता. सदर शववाहिका घेण्यासाठी मंजुरी देण्यात आल्याने लाखो रुपये खर्च करून दोन नवीन शववाहिका घेण्यात आल्या आहेत. अलीकडेच मोठ्या थाटामाटात शववाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. पण शववाहिकांचा प्रत्यक्षात वापर होत नाही. त्यामुळे दोन्ही शववाहिका सदाशिवनगर स्मशानभूमीच्या आवारात तशाच उभ्या आहेत. आरटीओ रजिस्ट्रेशन झाले नसल्याने शववाहिका बाहेर काढल्या जात नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे जुन्या शववाहिकांचा वापर सध्या सुरू आहे.