For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनपाच्या आश्रय विभागाला गळतीचे ग्रहण

06:23 AM Jul 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
मनपाच्या आश्रय विभागाला गळतीचे ग्रहण
Advertisement

नवीन इमारत बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव

Advertisement

महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. विशेष करून आश्रय विभागात स्लॅबमधून पाण्याची गळती होत आहे. विभागात सर्वत्र पाणीच पाणी झाले असल्याने तशातच बसून अधिकारी व कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. कागदपत्रांना धोका पोहोचू नये यासाठी त्यावर कागद व कापड झाकण्यात आले आहे. मनपाच्या मुख्य इमारतीलाच गळती लागली असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

2008 पूर्वी म्हणजे 18 वर्षांपूर्वी मनपाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले आहे. त्यासाठी कोट्यावधींचा निधी खर्ची घालण्यात आला आहे. मात्र, इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागाच्या प्रवेशद्वारावरच मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. मात्र, सदर गळती काढण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे सदर पाण्यातूनच अधिकारी व नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. ही परिस्थिती असतानाच आता पहिल्या मजल्यावर असलेल्या आश्रय विभागातही मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी झिरपत आहे. भिंतींना शेवाळ पकडले असून दोन इंच पाणी साचून आहे. त्यामुळे सदर विभागात कुबट वास पसरला आहे. सदर पाण्यात बसूनच अधिकारी व कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामे करावी लागत आहेत. गेल्या काही वर्षांपासून ही परिस्थिती कायम असली तरी यंदा मात्र समस्येत आणखीनच भर पडली आहे. सध्या अधिकारी व कर्मचारी एसआयआर कामात व्यस्त आहेत. त्यामुळे सदर विभागात तितकीशी वर्दळ नाही. पण एसआयआरचे काम लवकरच संपणार असल्याने पुन्हा आश्रय विभागाचे कामकाज पूर्वपदावर येणार आहे. त्यावेळी मोठी गैरसोय होणार आहे. शहर व उपनगरातील गोरगरीब जनतेला आश्रय विभागातून घरे मंजूर केली जातात. मात्र, लोकांना छत मिळवून देणाऱ्या आश्रय विभागाच्या छतालाच गळती लागली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Advertisement

.