कॉलेज रोडवरील धोकादायक गटारीकडे मनपाचे दुर्लक्ष
गटारीवर झाकण बसविण्याची मागणी
बेळगाव : मुसळधार पावसामुळे गटारीतील पाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण झाल्याने कॉलेजरोडवर सांडपाणी गटारीतून बाहेर येत होते. त्यामुळे नगरसेवक शंकर पाटील यांनी गटारीवरील जाळी काढून तेथील केरकचरा काढल्याने पाणी वाहून जाण्यास मदत झाली. मात्र सदर गटार तशीच उघडी असल्याने ती धोकादायक बनली आहे. त्यामुळे गटारीवर झाकण घालण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. मध्यंतरी झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. पावसाळ्यापूर्वी गटारींची सफाई करण्यात यावी, अशी सूचना मनपा अधिकाऱ्यांना वारंवार करण्यात आली.
मात्र प्रत्यक्षात व्यवस्थितरित्या नाले व गटारींची सफाई करण्यात आली नाही. त्यामुळे पहिल्याच पावसात महापालिकेच्या नाले आणि गटार स्वच्छतेचे पितळ उघडे पडले. गटारीतील सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते दुकान आणि घरांमध्ये शिरण्याचे प्रकार घडले. काही ठिकाणी नाल्यांमध्ये अडथळे तसेच होते. त्यामुळे पावसाचे पाणी नाल्यातून वाहून जाण्याऐवजी नाल्याबाहेर पडण्याचे प्रकारही घडले. ही बाब गांभीर्याने घेत मनपा आयुक्त शुभा बी. यांनी स्वत: अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शहर व उपनगरचा फेरफटका मारला.
ज्या भागात दरवर्षी पावसाळ्यात पाणी तुंबते तशा परिसरांना भेट देऊन माहिती घेतली. अनेकवेळा अधिकाऱ्यांना सांगूनदेखील प्रत्यक्षात कारवाई होत नसल्याने कॉलेज रोडवरील गटारीवर घालण्यात आलेले झाकण नगरसेवक शंकर पाटील यांनी हटवून तेथील कचरा काढला होता. मात्र त्यानंतर गटारींवरील झाकण बसविण्यात आले नसून गटार तशीच उघडी आहे. या मार्गावर नेहमी नागरिकांची वर्दळ असते. पदपथावरून चालत जात असताना रात्रीच्यावेळी गटारीचा अंदाज येत नसल्याने सदर गटार धोकादायक बनली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडण्यापूर्वी गटारीवर झाकण घालण्यात यावे, अशी मागणी होत आहे.