मनपाच्या शववाहिन्या बनल्या केवळ शोभेच्या वस्तू
चालकाअभावी शववाहिन्या वेळेत मिळणे कठीण : खासगी शववाहिन्यांवर नागरिकांची भिस्त
बेळगाव : महानगरपालिकेच्या शववाहिन्याबाबत नागरिकांतून दिवसेंदिवस तक्रारी वाढत चालल्या आहेत. शववाहिकेसाठी संपर्क साधला असता आपल्याकडे चालकांची कमतरता आहे. त्यामुळे वेळेत सेवा देणे अशक्य असल्याचे अजब उत्तर दिले जात असल्याने नागरिकांना खासगी शववाहिन्यांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. रविवारी भेंडीबाजार येथील एका रहिवाशाचे निधन झाले. नातेवाईकांनी सायंकाळी 6 वाजता अंत्यविधी करण्याचे निश्चित करून कलमठ रोड येथील मनपाच्या कार्यालयाला संपर्क साधून शववाहिनी पाठविण्याची विनंती केली. मात्र त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांकडून सध्या चालकांची कमतरता असल्याने रात्री 8 वाजता शववाहिनी पाठवितो. त्यावेळी तुम्ही अंत्यसंस्कार करा असा अजब सल्ला देण्यात आला. त्यामुळे एका खासगी शववाहिनीला संपर्क साधून येण्यास सांगितले.
शववाहिन्यांच्या सेवेबाबत नागरिकांच्या तक्रारी कायम
महानगरपालिकेकडून अलिकडेच मोठा गाजावाजा करून दोन अत्याधुनिक शववाहिन्यांचे लोकार्पण करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात सेवा देण्यात महापालिका कमी पडत आहे. दररोज या ना त्या ठिकाणी नागरिकांचे निधन होत असते. त्यामुळे महापालिकेच्या शववाहिन्यांवर अवलंबून रहावे लागते. गेल्या अनेक वर्षांपासून मनपाच्या शववाहिन्यांच्या सेवेबाबत नागरिकांच्या तक्रारी कायम आहेत. शववाहिन्यांसाठी संपर्क साधला असता व्यवस्थितरित्या प्रतिसाद दिला जात नाही. महापालिकेकडून सहा चालकांची शववाहिन्यांवर नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. रविवारी केवळ एकच चालक उपलब्ध होता, अशी माहिती मिळाली आहे. एकाच दिवशी पाच चालकांना सुटी देण्यामागचे गौडबंगाल काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. रविवारी काही जणांनी मनपाच्या कार्यालयाकडे जाऊन पाहणी केली असता कार्यालय सुरू होते. मात्र त्या ठिकाणी कोणीच नसल्याचे दिसून आले.
सेवा देण्यात महापालिका अपयशी
लाखो रुपये खर्च करून मनपाकडून शववाहिन्या खरेदी केल्या जात आहेत. पण सेवा देण्यात महापालिका अपयशी ठरत आहे. त्यामुळे बेळगावकरांतून मनपाच्या या भोंगळ कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. चालकांची कमतरता असल्याने लवकरच निविदा मागविली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. पण शववाहिन्या वेळेत उपलब्ध होत नसल्याने मृतदेहांची हेळसांड होत आहे. याकडे महापालिका अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.