For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनगोळ नाक्यावरील शुभेच्छा फलकावरून मनपाची डोकेदुखी

12:19 PM Oct 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
अनगोळ नाक्यावरील शुभेच्छा फलकावरून मनपाची डोकेदुखी
Advertisement

बेळगाव : अनगोळ नाक्यावरील शुभेच्छा फलक हटविण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या पथकावर काहींनी दांडगाई करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे फलक हटविण्यासाठी गेलेले पथक कोणतीही कारवाई न करताच हात हलवत परतले. शनिवारी रात्री 10.30 च्या दरम्यान हा प्रकार घडल्याने घटनास्थळी टिळकवाडी पोलिसांनी धाव घेतली. परिणामी अनगोळ नाक्यावरील शुभेच्छा फलक तसेच असून ते कळीचा मुद्दा बनले आहेत. शहर व परिसरात राजकीय नेते व विविध धार्मिक बॅनर झळकत आहेत. गणेशोत्सव, दसरा व दीपावलीच्या शुभेच्छा देणारे फलक तर काही ठिकाणी ‘आय लव्ह...’चे फलकही लावण्यात आले आहेत. पण अशा काही फलकांमुळे वादावादीच्या घटना घडण्यासह अनेक गैरप्रकार घडत आहेत. गणेशोत्सव व दसऱ्याच्या शुभेच्छा देणाऱ्या फलकांची शहरात भाऊगर्दी झाली आहे. मात्र, ते फलक संबंधितांकडून हटविले जात नसल्याने महानगरपालिकेकडून हटविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

Advertisement

विशेष करून शहराच्या दक्षिण भागात विविध रस्ते फलकांनी झाकोळले आहेत. शहापूर येथील काही स्वागत फलक यापूर्वीच हटविण्यात आले आहेत. मात्र, अनगोळ नाक्यावर लावण्यात आलेल्या फलकावरून पेचप्रसंग निर्माण झाला आहे. त्या ठिकाणी दोन गटांतर्फे जाहिरातबाजी करण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वी महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे पथक त्या ठिकाणचे शुभेच्छा फलक हटविण्यासाठी गेले होते. त्यावेळी स्वत:हून फलक काढले जातील, असे आश्वासन संबंधितांच्या समर्थकांनी दिल्याने मनपा पथक तेथून माघारी फिरले होते. त्यानुसार शनिवारी रात्री एका गटाच्या समर्थकांनी अनगोळ नाका येथील फलक स्वत:हून काढण्यास सुरुवात केली होती. तितक्यात 10.30 च्या दरम्यान महापालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले व त्यांनी दुसऱ्या गटाचे फलक काढण्याची तयारी दर्शविली. त्यावेळी अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर दांडगाई करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे तेथून मनपाचे पथक माघारी फिरले. परिणामी दोन्ही गटांचे शुभेच्छा फलक तसेच राहिल्याने मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.