महापालिकेच्या खाद्यमहोत्सवास प्रारंभ
कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिकेच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्य आयोजीत खाद्यमहोत्सवास शुक्रवार पासून सुरुवात झाली. यामध्ये 80 महिला बचत गटांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले आहेत. 15 डिसेंबर पर्यंत शाहूपुरी येथील सासने ग्राउंड मैदानावर सायंकाळी 5 ते 9 या वेळेत हा खाद्यमहोत्सव सुरु राहणार आहे. या महोत्सवामध्ये महिला बचतगटांनी बनवलेल्या खाद्य पदार्थांचा 100 प्रकारचे स्टॉल लावले आहेत. यामध्ये मांसाहारी लोकांसाठी वडा कोंबडा, बिर्याणी रस्सा, तांबडा पांढरा रस्सा, चिकन 65, नॉन व्हेज रोल, खांडोळी, रक्ती मुंडी, सोलापूरी चिकन, मटण लोणचे तसेच शुध्द शाकाहारीमध्ये थाली पीठ, झुणका भाकरी, पुरण पोळी, विविध प्रकारची बिस्कीटे, आंबोळी, दावनगिरी डोसा, वडापाव, पकोडे, व्हेज रोल, पाणी पुरी, पिझ्झा, भेल, स्प्रिंग पोटॅटो, पापड, तिकट सांडगे, दाबेली अश्याप्रकारचे खाद्यपदार्थ या स्टॉलवर नागरीकांना खायावयास मिळणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, मुलांसाठी स्पॉट गेम, फनी गेमचे आयोजन करण्यात आले आहे. या स्टॉलला नागरीकांची मोठया प्रमाणात गर्दी केली असून मुलांनी या ठिकाणच्या विविध प्रकारच्या गेमचा आनंद घेत जल्लोष केला .तरी या स्टॉलला नागरीकांनी भेट देऊन या खाद्य महोत्सवातील विविध पदार्थांचा आनंद घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
महापालिकेचा रविवारी वर्धापनदिन
कोल्हापूर महानगरपालिकेचा रविवारी (15 डिसेंबर) रोजी 52 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. सकाळी 9.00 वाजता महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकामध्ये प्रशासक कार्तिकेयन एस यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात येणार आहे. ध्वजारोहनानंतर सकाळी 09.10 वाजता माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत शपथ घेण्यात येणार आहे. यानंतर देशाच्या रक्षणाकरीता धारातीर्थ पडलेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपिता व वीरपत्नी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.