For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महापालिकेचे कम्युनिटी मोबिलायझर तीन महिन्यांपासून वेतनाविना

02:55 PM Feb 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
महापालिकेचे कम्युनिटी मोबिलायझर तीन महिन्यांपासून वेतनाविना
Advertisement

बेळगाव : महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्यांना किमान वेतन देण्यात यावे. शहराच्या स्वच्छतेचा ठेका कामगार परवाना नसलेल्या बेंगळूर येथील गणेश शंकर कंपनीला देण्यात आला आहे. त्यांच्याकडून 300 सफाई कामगारांची बेकायदा नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेत कम्युनिटी  मोबिलायझर म्हणून काम करणाऱ्या 33 कर्मचाऱ्यांचा तीन महिन्याचा पगार थकविण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व गंभीर प्रकारांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन सफाई कामगार हितरक्षण समितीच्यावतीने गुरुवारी कामगार उपायुक्त राजेश जाधव यांना देण्यात आले.

Advertisement

महानगरपालिकेत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळाले पाहिजे. तसेच 2018 पासून ते आतापर्यंत फरक रक्कम देण्यात यावी. यापूर्वी 2018 पर्यंत फरक रक्कम देण्यात आली आहे. मात्र 2018 नंतर आजपर्यंत फरक रक्कम देण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या काम करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांसह निवृत्त झालेल्यांनाही फरक रक्कम देण्यात यावी. सदर रक्कम कोटीच्या घरात आहे. महानगरपालिकेकडून ऑगस्ट 2025 मध्ये शहर स्वच्छतेचा ठेका गणेश शंकर या कंपनीला देण्यात आला आहे. मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून या कंपनीला ठेका देण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला.

बेळगावात ठेका घेत असताना कामगार खात्याकडून सर्वप्रथम रितसर कामगार परवाना घेणे आवश्यक आहे. पण तसे झालेले नाही. त्यातच सदर कंपनीकडून 300 जणांची नियुक्ती करून घेण्यात आली आहे. अध्यादेश काढण्यापूर्वीच नियुक्ती करणे नियमबाह्य आहे. त्यामुळे याचीही योग्य चौकशी करून कारवाई करावी. महापालिकेकडून ऑगस्ट 2025 मध्ये कम्युनिटी मोबिलाइझरमधून 33 जणांची नियुक्ती करून घेण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छता योजनेतून ही नियुक्ती करण्यात आली असून त्यांना प्रतिमहा 18,850 रुपये वेतन ठरले आहे.

Advertisement

मात्र त्यांना आतापर्यंत  केवळ दीड महिन्याचेच वेतन देण्यात आले आहे. तर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्याचे वेतन देण्यात आलेले नाही. तब्बल तीन महिन्याचे वेतन थकविण्यात आले असल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची कामे लावली जात आहेत. त्यामुळे या सर्व गंभीर प्रकरणांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देताना सफाई कर्मचारी हितरक्षण समितीचे दीपक वाघेला, विजय निरगट्टी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.