For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महापालिकेचा 92.32 लाख रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक सादर

06:50 AM Feb 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
महापालिकेचा 92 32 लाख  रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक सादर
Advertisement

अर्थस्थायी समितीच्या अध्यक्षा रेखा हुगार यांच्याकडून अंदाजपत्रक सादर : खुल्या जागेच्या माध्यमातून महसूल जमा करण्यासाठी प्राधान्य

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

महानगरपालिकेचे 2026-27 वर्षासाठीचे अंदाजपत्रक बुधवारी अर्थ व कर स्थायी समितीच्या अध्यक्षा रेखा हुगार यांनी महापालिकेच्या सभागृहात सादर केले. सुमारे 442 कोटी 54 लाख 51 हजार रुपयांचा अंदाजे महसूल गोळा होणार असून 44 कोटी 16 लाख 32 हजार रुपये अंदाजे खर्च तर 92 लाख 32 हजार रुपये शिलकी अंदाजपत्रक मांडण्यात आले. यावेळी विशेष करून महापालिकेच्या खुल्या जागांमधून सुमारे 1 कोटी 10 लाख रुपयांचा महसूल वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Advertisement

महानगरपालिकेकडून दरवर्षी अंदाजपत्रक सादर केले जाते. त्यानुसार यावर्षीही 2026-27 वर्षासाठीचे अंदाजपत्रक सादर करण्यापूर्वी 27 जानेवारी रोजी शहरातील विविध संघ-संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी संबंधितांकडून अंदाजपत्रकासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. तसेच त्यांच्याकडून मतेही मागविण्यात आली होती. त्यानंतर सत्ताधारी गटांच्यावतीने अंदाजपत्रक तयार करून त्याला नुकत्याच पार पडलेल्या अर्थ व कर स्थायी समितीच्या बैठकीत तत्कालिक मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार बुधवारी सकाळी 11.30 वा. अंदाजपत्रकीय बैठकीचे आयोजन महापालिकेच्या मुख्य सभागृहात करण्यात आले होते. मात्र सध्या मुस्लीम बांधवांचा रोजा सुरू असल्याने विरोधी गटातील उर्दू भाषिक नगरसेवकांनी दुपारी बैठकीचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी केल्याने सकाळची बैठक दुपारी ठेवण्यात आली. 1 वाजता सुरू होणारी बैठक तब्बल 2 वाजता सुरू झाली. त्यामुळे उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली.

सुरुवातीला अर्थ व करस्थायी समितीच्या अध्यक्षा रेखा हुगार यांनी उपस्थितांचे स्वागत करून 2026-27 वर्षासाठीचे अंदाजपत्रक सादर केले जाणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर महापौर मंगेश पवार यांच्या हस्ते अंदाजपत्रक पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. महापौरांच्या परवानगीवरून अर्थ स्थायी समितीच्या अध्यक्षा रेखा हुगार यांनी कागदपत्रकांचे वाचन केले. स्वच्छ व सुंदर बेळगाव बनविण्यासाठी महापालिकेचा उद्देश आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक, अनुसूचित जाती जमाती, दिव्यांग व समाजातील इतर घटक लक्षात घेऊन अंदाजपत्रकात विशेष तरतूद करण्यात आली आहे.

शहरातील रस्ते, सर्कल व वाहनांची संख्या व इतर प्रमुख विषय डोळ्यांसमोर ठेवून हे अंदाजपत्रक मांडले जात आहे. त्यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हे अंदाजपत्रक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानंतर सत्ताधारी गटनेते हणमंत कोंगाली यांनी अर्थस्थायी समितीच्या अध्यक्षा हुगार यांनी मांडलेल्या अंदाजपत्रकाचे कौतुक करत सदर अंदाजपत्रक शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरेल, असे मत व्यक्त केले. यानंतर विरोधी गटातर्फे मात्र अंदाजपत्रकावरून नाराजी व्यक्त करण्यात आली. शहरातील संघ-संस्थांची बैठक घेण्यापूर्वी हे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. त्यामुळे याबाबत अभ्यास करून पुढील सर्वसाधारण बैठकीत आपले विचार व्यक्त करू, असे विरोधी गटातील नगरसेवकांनी सांगितले. यावेळच्या अंदाजपत्रकात विशेष करून शहरातील भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण केंद्रासाठी 2 कोटी 10 लाख रुपयांचा निधी खर्च केला जाणार असून महापालिकेच्या खुल्या जागांच्या माध्यमातून महसूल मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सुमारे 1 कोटी 10 लाख रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे.

अंदाजे मिळणारा महसूल

►महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या मालमत्तांच्या कर वसुलीच्या माध्यमातून अंदाजे 8500.00 लाख रुपये निश्चित करण्यात आले आहेत. तर सदर कर वसूल करण्यासाठी एक विशेष मोहीम उघडली जाईल. सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मालमत्तेचा तपशील सॉफ्टवेअरमध्ये नोंदविण्यासाठी व नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी पावले उचलली जातील.

►मालमत्तांचे हस्तांतरण शुल्क आणि दंडातून अंदाजे 755.30 इतका महसूल अपेक्षित आहे.

► बांधकाम परवाने, विकासशुल्क, सुधारणा शुल्क या माध्यमातून 989.98 लाख रुपयांचा महसूल अपेक्षित आहे.

► महापालिकेच्या खुल्या जागांच्या माध्यमातून 1 कोटी 10 लाख रुपयांचा महसूल अपेक्षित आहे.

► घनकचरा व्यवस्थापनातून 975.00 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. व्यवसाय परवानाच्या माध्यमातून 400.00 लाख महसूल अपेक्षित आहे.

► शहरातील ड्रेनेज जोडणीच्या माध्यमातून 500.00 लाख अंदाजे उत्पन्न अपेक्षित आहे.

►एसएफसी आणि निधी अनुदानाअंतर्गत 322.00 लाख अपेक्षित असून ही रक्कम राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार वापरली जाईल. शिवाय एसएफसी ओपन निधी अंतर्गत नव्याने भरती झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि आपत्ती भत्त्यासाठी 1008.12 लाख रुपये अपेक्षित आहे.

►एसएफसी विद्युत शक्ती अनुदान 6264.00 लाख रुपयांचे अनुदान अपेक्षित आहे आणि ही रक्कम पथदीप व पाणीपुरवठा प्रकल्पांचे वीजबील भरण्यासाठी वापरले जाईल.

► 16 व्या वित्त आयोगाचे अनुदान 2100.00 लाख रुपये अपेक्षित आहे.

► अवशेष काढून टाकण्यापासून 169.00 लाख रुपये अपेक्षित आहे.

►मनपाच्या व्याप्तीतील रस्ते खोदकामाच्या माध्यमातून 150.00 लाख मिळण्याची अपेक्षा आहे.

►स्थावर मालमत्तेच्या नोंदणीतून 130.00 लाख मिळणे अपेक्षित आहे.

अंदाजे खर्च

►अल्पोपहार खर्च दररोज 35 रुपये प्रमाणे एकूण 200.00 लाख रुपये महापालिका स्वत:च्या निधीतून भरणार आहे.

► बेळगाव शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कंत्राटी स्वच्छता खर्चासाठी 3825.00 लाख रुपये राखून ठेवण्यात आले आहे.

► थेट भरती झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 1100.00 लाख खर्च करण्यात येणार आहे.

► वैज्ञानिक घनकचऱ्यांच्या विल्हेवारीसाठी 400.00 लाख ठेवण्यात आले आहे.

► पथदीपांच्या देखभालीसाठी 50.00 लाख राखीव ठेवण्यात आले आहे.

► रस्ते, ड्रेनेज, पादचारी, पावसाचे पाणी व्यवस्थापन, रस्त्यांच्या दिशादर्शकासाठी 695.00 लाख रुपये खर्च होणार आहे.

► भटक्या कुत्र्यांच्या शेड बांधणी आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी 210.00 लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत.

► अंदाजपत्रकातील सर्व ठेवी आणि खर्च वगळता मनपाच्या उत्पन्नाच्या 1 टक्के रक्कम खेळासाठी असून 14.43 लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहे.

►पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व कूपनलिकांसाठी 25.00 लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहे.

► बेळगाव स्मार्ट सिटी लिमीटेडच्या सिटीज 2 योजनेसाठी 500.00 लाख रुपयांचे योगदान दिले जाईल.

अंदाजे भांडवली खर्च

►शहरातील 58 प्रभागांमध्ये नवीन रस्ते, सीसी रस्ते, गटारी बांधण्यासाठी व एकूण पायाभूत सुविधा व विविध आवश्यक पायाभूत सुविधांसाठी 2700.00 लाख  निधी खर्च केला जाणार आहे.

►महापालिका मालमत्तेच्या आणि खुल्या जागेच्या संरक्षणासाठी 200.00 लाख खर्च करण्यात येणार आहे.

►उद्यानांच्या विकासासाठी 135.00 लाख रुपये खर्च केले जाणार आहे.

► ड्रेनेज दुरुस्ती आणि नवीन बांधकामासाठी तसेच सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी 200.00 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

►महापालिकेत ई ऑफिस सुरू करण्यासह संगणकीकरण व यंत्रसामग्री खरेदीसाठी 145.00 लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत.

Advertisement
Tags :

.