मनपाच्या 107 कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी
पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, शहरी विकासावर विशेष भर: महापौर मोन्सेरात यांची माहिती
पणजी : पणजी मनपाच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 107.17 कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. त्याद्वारे पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, सुधारित देखभाल आणि वाढीव महसूल निर्मितीद्वारे शहराच्या विकासावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. महापौर रोहित मोन्सेरात यांच्या अध्यक्षतेखाली ही अर्थसंकल्पीय बैठक झाली. त्यात प्रामुख्याने मनपाची महसुली बाजू मजबूत करण्यावर प्राधान्याने चर्चा झाली. विशेष म्हणजे गतवर्षीच्या 121 कोटी ऊपयांच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प सुमारे 14 कोटी ऊपये कमी खर्चाचा आहे.
यंदाही शिलकी अर्थसंकल्प सादर
या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मोन्सेरात यांनी या अर्थसंकल्पीय निधीतून पणजीतील विविध विकास कामे करण्यास प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले. तत्पूर्वी झालेल्या बैठकीत विरोधकांनी ‘उत्पन्न कमी आणि खर्च जास्त’ असा अर्थसंकल्प असल्याची टीका केली होती. त्यासंबंधी विचारले असता, मोन्सेरात यांनी मनपा कधीच तोट्यात गेलेली नसल्याचा दावा केला. त्याही पुढे जाताना आम्ही गत काही वर्षांप्रमाणे यंदाही शिलकी अर्थसंकल्पच सादर केल्याचे ते म्हणाले.
नागरिकांवर आर्थिक बोजा नाही
शहरातील प्रमुख मासळी बाजाराचे बांधकाम योग्य पद्धतीने झालेले नाही. त्यामुळे ते काम पुन्हा नव्याने करावे लागणार आहे. तसेच भाजी मार्केटमध्येही विविध कामे करण्यात येणार आहेत. अशाप्रकारे विविध विकास कामांसाठी सुमारे 25 कोटींची तरतूद केली आहे. तरीही हा निधी उभारण्यासाठी आम्ही सामान्य नागरिकांवर घरपट्टी वाढ किंवा तत्सम अन्य असा कोणताही आर्थिक बोजा टाकणार नाहीत, अशी ग्वाही मोन्सेरात यांनी दिली. सध्या पावसाळा तोंडावर आलेला असताना विविध प्रभागामध्ये सांडपाणी वाहिनी, गटार दुऊस्ती यासारखी कामे हाती घेणे आवश्यक आहे. परंतु कामगारांची कमतरता अल्याने नगरसेवकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून मनपाने प्रत्येक प्रभागासाठी प्रत्येकी दोन याप्रमाणे कायमस्वऊपी लेबर पुरवावे, अशी सूचना नगरसेवक उदय मडकईकर यांनी केली. त्यावर विचार करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले.
18 जून रस्त्याचे काम लवकरच हाती घेणार
स्मार्ट सिटीने याआधी राजधानीत एकाच वेळी विकासकामे हाती घेतली होती. त्यासाठी सर्व रस्ते बंद केल्याने शहरात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली होती. परिणामी 18 जून रस्त्याचे काम स्थगित ठेवण्यात आले होते. सदर काम आता लवकरच हाती घेण्यात येणार असून ते काम प्रत्यक्ष सुरू करण्यापूर्वी आराखडा सादर करण्याची मागणी स्मार्ट सिटीकडे केली आहे, अशी माहिती मोन्सेरात यांनी दिली.