मनपा करणार हजार कुत्र्यांची नसबंदी
सांगली :
मोकाट आणि भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला पायबंद घालण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने नसबंदीची मोहिम राबविण्याच्या दृष्टीने मेगा प्लॅन तयार केला आहे. मनपा आरोग्य विभागाच्यावतीने दर महिन्याला किमान एक हजार मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्याचा प्रस्ताव आहे. सध्या ही क्षमता ३०० च्या घरात असली तरी लवकरच एक हजार करून वाढत्या संख्येला पायबंद घालण्यासाठी मनपाच्या बजेटमध्ये सुमारे दोन कोटीची तरतुद करण्यात आली आहे. मनपाची ही सेवा शहराच्यालगतच्या आसपासच्या गावांनाही पुरविण्यात येणार आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार मनपा क्षेत्रात मोकाट कुत्र्यांची संख्या १५ ते १८ हजाराच्या आसपास आहे. मनपाच्या स्थापनेनंतर पहिली काही वर्षे मोकाट कुत्र्यांबाबतीत आरोग्य विभागाने चांगले काम केले होते. डॉ. नारायण गोदाजी या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली १९९८ नंतर मोठ्या प्रमाणात कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली होती. पण नसबंदीनंतर अशा कुत्र्यांना किमान दोन ते तीन दिवस पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली ठेवावे लागत होते. या कुत्र्यांना प्रतापसिंह उद्यानात पिंजऱ्यात ठेवले जात होते. दोन तीन दिवसानंतर पुन्हा शहरात सोडून दिले जात होते. पण नसबंदीनंतर यातील काही कुत्री मरण पावू लागली. त्यातच डॉ. गोदाजी यांना मुदतवाढ मिळाली नाही. त्यामुळे कुत्र्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव बारगळला. काही प्राणीमित्र संघटनाच्या मदतीने मानधनावर घेण्यात आलेल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी २०१९ च्या महापूरानंतर पुन्हा एकदा कुत्र्यांच्या नसबंदीच्या शस्त्रक्रिया सुरू केल्या. पण प्राणीसंग्रहालयातील अस्वच्छता व अपुरी साधने यामुळे हाही प्रयोग फसला. हा प्रकल्प काही दिवस बंदच पडला. मनपाच्या आकडेवारीनुसार सध्या ३०० च्या आसपास शस्त्रक्रिया होतात.
लोकांना आकेडवारीशी काहीही देणेघेणे नाही. मोकाट कुत्र्यांची संख्या व त्यांचे चावे कमी व्हावेत ही अपेक्षा आहे. त्यादृष्टीने मनपाने पुन्हा एकदा नव्या जोमाने मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीचा प्रयोग राबविण्याचे ठरविले आहे. मनपाच्या नुकत्याच सादर करण्यात आलेल्या बजेटमध्ये सुमारे दोन कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे.
मनपाचे मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीचे हे पहिलेच केंद्र ठरणार आहे. दोन कोटीच्या निधीतून अद्ययावत ऑपरेशन थिएटर, नवीन डॉग व्हॅनची खरेदी व अन्य यंत्रणेची उभारणी होईल.
- मोकाट कुत्र्यांच्या समस्येचा प्रश्न 'तरूण भारत संवाद' कडुन ऐरणीवर
मनपा क्षेत्रातील मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या आणि चाव्यांचे प्रमाण हा विषय 'तरूण भारत सवांद'ने ऐरणीवर आणून मनपा आरोग्य विभागाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेवून मनपाने यंदाच्या वर्षभरात मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीवर अधिक लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले. बजेटमध्ये दोन कोटीची तरतुद करून दर महिन्याला किमान एक हजार मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीचा निर्णय घेतला आहे. याचे शहरवासियांतून स्वागत करण्यात येत आहे.
- आसपासच्या गावांनाही सुविधा मिळणार
मोकाट कुत्र्यांची समस्या ही केवळ मनपा क्षेत्रातच आहे असे नाही. पालिका क्षेत्राबरोबरच शहरालगतच्या माधवनगर, बुधगाव, कवलापूर, बिसूर, खोतवाडी, वाजेगाव, नांद्रे, वसगडे, मौजे डिग्रज, कसबे डिग्रज, कवठेपिरान, समडोळी, दुधगाव, हरिपूर, अंकली, धामणीसह अन्य ठिकाणी आहे. मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीसाठी मनपाचा आरोग्य विभाग सुविधा उपलब्ध करून देणार आहे. ग्रामपंचायत हद्दीतील मोकाट कुत्री पकडुन त्यांच्यावर नसबंदीची शस्त्रक्रिया मोफत होणार की चार्जेस आकारणार याबाबत धोरण ठरलेले नाही.