मनपाकडून तलाव, विसर्जन मार्गांची तातडीने स्वच्छता
सलग तीन दिवस सफाई कर्मचारी व्यस्त
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
अनंत चतुर्दशीनिमित्त शहरात सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन मोठ्या जल्लोषात पार पाडल्यानंतर महानगरपालिकेकडून तलाव, विसर्जन मार्ग व शहर स्वच्छतेसाठी तातडीने पाऊले उचलण्यात आली. सलग तीन दिवस मनपा सफाई कर्मचारी स्वच्छतेच्या कामात व्यस्त होते. त्यामुळेच शहर, तसेच तलावांचा परिसर चकाचक दिसत आहे.
विसर्जन मिरवणुकीचा मुख्य मार्ग असलेल्या हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, खडेबाजार, किर्लोस्कर रोड, रामलिंगखिंड गल्ली, हेमू कलानी चौक, शनि मंदिर, कपिलेश्वर रेल्वे उ•ाणपूल, जक्कीन होंड, कपिलेश्वर जुना आणि नवा तलाव परिसरात सर्वाधिक कचरा साचला होता. ढोल-ताशांच्या मिरवणुकीत उधळलेला शेकडो किलो गुलाल, फुलांच्या माळा, हार, फटाक्यांची कागदे आणि प्लास्टिकच्या कचऱ्याचा मोठा खच या मार्गावर पडला होता. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार सफाई कर्मचारी सातत्याने स्वच्छतेच्या कामात व्यस्त होते.
महानगरपालिकेकडून शहरात 9 ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे स्वच्छतेचे मोठे आव्हान महानगरपालिकेसमोर होते. निर्माल्य जमा करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे तलावातील प्रदूषण कमी होण्यास मदत झाली. महापालिकेने विसर्जनासाठी 9 ठिकाणची नियोजनबद्ध व्यवस्था केल्यामुळेच स्वच्छता मोहीम वेगात राबविणे शक्य झाले.