गोंधळी गल्लीत कचरा टाकणाऱ्यांवर मनपाकडून दंडात्मक कारवाई
बेळगाव : गोंधळी गल्लीत रस्त्याच्याकडेला कचरा टाकणाऱ्यांना महापालिकेने नोटीस बजाविण्यासह काही जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. घंटागाडीकडे कचरा देण्याऐवजी काहीजण रस्त्यावर कचरा टाकत असल्याने ही बाब महापालिकेच्यावतीने गांभीर्याने घेण्यात आली आहे. स्वच्छ व सुंदर बेळगाव बनविण्यासाठी एकीकडे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मात्र जिकडे तिकडे कचरा टाकला जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. शहर व उपनगरातील कचऱ्याची उचल करण्यासह त्याचे वर्गीकरण केले जात आहे. नागरिकांनी घंटागाडीकडे कचरा देताना ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून द्यावे, असे आवाहन वारंवार केले जात आहे.
पण अद्यापही महापालिकेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. जिकडे तिकडे पुन्हा ब्लॅकस्पॉट निर्माण झाले आहेत. गोंधळी गल्लीत रस्त्याच्याकडेला काही दुकानदारांनी व रहिवाशांनी प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये वर्गीकरण न करताच कचरा फेकून दिला होता. ही बाब नगरसेवक शंकर पाटील यांच्या निदर्शनास येताच त्यांनी ही माहिती महापालिकेच्या पर्यावरण विभागाला दिली. त्यानंतर अधिकारी आदिलखान पठाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी गोंधळी गल्लीत धाव घेऊन कचऱ्याची पाहणी केली. त्यावेळी सदर कचऱ्यात मेडिकल वेस्टदेखील टाकून देण्यात आले होते. त्यामुळे कचरा टाकणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना नोटीस बजाविण्यासह काही जणांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली.