महापालिकेची वसंतदादा बँकेला 356 कोटीच्या वसुलीसाठी नोटीस
सांगली प्रतिनिधी
अवसायनातील वसंतदादा सहकारी बँकेत अडकलेल्या 43 कोटींच्या ठेवी व त्यावरील 13 वर्षांचे व्याज अशी 356 कोटींची मागणी महापालिकेने सहकार विभागाकडे केली असली तरी बँकेच्या येणी व देणी यांचे जर प्रमाण पाहिले तर सांगली महापालिकेला 356कोटी सोडा 43 कोटीची पूर्ण मुद्दल मिळणेही कठीण आहे. महापालिकेसह 226 पतसंस्था, बाजार समिती कर्मचारी संस्थेसह अन्य काही संस्था ठेवींच्या प्रतीक्षेत आहेत. मुळात वसंतदादा बँकेत ठेवी अडकल्यापासून आतापर्यत प्रशासनाने काय केले ? असा सवाल उपस्थित होत आहे. सांगली महापालिकेतील तत्कालिन कारभाऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकेत ठेवी काढून वसंतदादा बँकेत ठेवण्याचा विक्रम केला, त्यांच्या विरूध्द कोणतीही कारवाई केली नाही,आणि बँकेत अडकलेल्या या ठेवी व्याजासह वसूल करण्यासाठी प्रशासनाने नोटीस पाठवली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेने राष्ट्रीयकृत बँकेत पैसे ठेवण्याचा नियम असताना, सांगली महापालिकेच्या तत्कालीन पदाधिकार्यांसह अधिकाऱ्यांनी 43 कोटींच्या ठेवी वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेत ठेवल्या. ही बाब, ठराव नियमबाह्य असतानाही ,विरोध झालेला असतानाही ठेवी ठेवल्या गेल्या. बँक अवसायनात जाण्याआधी आणि गेल्यानंतर प्रशासनाने कोणतेच प्रयत्न केले नाहीत. महापालिकेने यापूर्वी अनेकदा न्यायालयीन लढाईचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. मुळातच महापालिकेने या ठेवी नियमबाह्य पद्धतीने ठेवल्याने त्यांच्यावर लेखा परीक्षणात ताशेरेही ओढले होते. अशा स्थितीत एक तप या पैशांपासून महापा†लकेला वांचित राहावे लागले आहे.
आता महापालिका आयुक्तांनी व्याजासह संपूर्ण रकमेची मागणी केली आहे, प्रत्यक्षात अवसायनातील वसंतदादा बँकेची स्थिती पाहिल्यास त्यांची संपूर्ण रक्कम मिळणे कठीण दिसत आहे. पुर्ण रक्कम सोडा, मुद्दलही मिळणे अवघड आहे. मुळात विनातारणी कर्जप्रकरणांमुळे ही बँक अवसायनात गेली. सद्य:स्थितीत शंभर कोटींवर कर्जाची रक्कम येणे बाकी दिसत असली, तरी त्यातील सुरक्षित म्हणजे तारणी कर्जाची रक्कम केवळ 25 कोटींच्या घरातच आहे. उर्वरीत 80 ते 90 कोटी ऊपयांच्या कर्जाची वसुली कोणतेही तारण नसल्याने अशक्य दिसत आहे. नियमानुसार कर्जवसुलीतून देणेकर्यांना समान वाटप केले जाते. अशा स्थितीत महापालिकेचा पाय खोलात गेल्याचे दिसत आहे.
निबंधकांच्या सूचनेप्रमाणेच रकमांचे वाटप केले जाते. उपलब्ध निधीनुसार ठेवीदारांना पैसे परत करण्यात येतील.
- मंगेश सुरवसे, जिल्हा उपनिबंधक तथा अवसायक, वसंतदादा बँक
महापालिकेच्या ठेवी प्राधान्याने परत कराव्यात, म्हणून आम्ही सहकार विभागाला नोटीस बजावली आहे. प्रसंगी आम्ही न्यायालयात दाद मागू.
- शुभम गुरव आयुक्त