मनपाची बैठक काही मिनिटातच गुंडाळली बांधकाम स्थायी समितीची बैठक
बांधकाम स्थायी समिती अधिकारी गैरहजर राहिल्याने अध्यक्ष, सदस्यांतून नाराजी
बेळगाव : महानगरपालिकेच्या बांधकाम स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीला बहुतांश अधिकारी गैरहजर राहिल्याने अध्यक्षा व सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वारंवार अधिकारी गैरहजर राहात असतील तर संबंधितांवर कारवाई करा. तसेच नियोजित बैठक पुढे ढकलावी, अशी मागणी केली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच विषयपत्रिकेवरील विषयांना मंजुरी देऊन बांधकाम स्थायी समितीची बैठक गुंडाळण्यात आली. मनपाच्या बांधकाम स्थायी समितीची बैठक बुधवारी सकाळी 11.30 वाजता घेणार असल्याची नोटीस सोमवारीच कौन्सिल विभागाकडून अध्यक्ष, सदस्य व अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली होती.
त्यानुसार बैठकीला अध्यक्षा माधवी राघोचे, सत्ताधारी गटनेते संतोष पेडणेकर, सदस्य राजू भातकांडे, शाहिदखान पठाण, श्रीशैल नाकाडी उपस्थित राहिले. मात्र, कौन्सिल सेक्रेटरी डॉ. सिद्धू हुल्लोळी, कायदा सल्लागार व मोजकेच अधिकारी सभागृहात हजर होते. त्यामुळे सुरुवातीलाच सदस्य शाहीदखान पठाण यांनी बहुतांश अधिकारी गैरहजर राहिल्याबद्दल कौन्सिल सेक्रेटरींना जाब विचारला. अधिकारीच बैठकीला उपस्थित रहात नसतील तर बैठक घेऊन काय उपयोग? यापूर्वीही बैठकीला अधिकारी गैरहजर राहिले आहेत. वारंवार असाच प्रकार घडत असेल तर संबंधितांवर काय कारवाई करता येईल? अशी विचारणा त्यांनी कायदा सल्लागार यांच्याकडे केली.
गैरहजर अधिकाऱ्यांना कळविले आहे
जे अधिकारी गैरहजर आहेत, त्यांनी फोनद्वारे तसेच लेखी स्वरुपात कळविले आहे, अशी माहिती कौन्सिल सेक्रेटरी डॉ. सिद्धू हुल्लोळी यांनी दिली. अध्यक्षा माधवी राघोचे यांनी आपल्याला केवळ दोनच अधिकाऱ्यांनी संपर्क साधून गैरहजर राहणार असल्याचे सांगितले आहे, असे स्पष्ट केले. सत्ताधारी गटनेते संतोष पेडणेकर यांनीही वारंवार असा प्रकार घडत असल्यास बरोबर नाही. अधिकारीच नसतील तर विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे कोण देणार? त्यामुळे आजची नियोजित बैठक पुढे ढकलण्यात यावी. ज्या दिवशी अधिकाऱ्यांना वेळ आहे, त्या दिवशी बैठक घेऊ, असे सांगितले. त्यानंतर काही वेळ चर्चा होऊन अजेंड्यावरील विषयांना मंजुरी देण्यात आली.
पुढील बैठक बुधवार 15 रोजी
पुढील बैठक बुधवार दि. 15 रोजी घेण्याचे निश्चित करून बैठक आटोपती घेण्यात आली. कौन्सिल सेक्रेटरी डॉ. सिद्धू हुल्लोळी यांनी देखील अधिकारी बैठकीला गैरहजर राहिल्याने नाराजी व्यक्त केली. संबंधितांनी आपल्या वरिष्ठांना बैठकीला हजर राहण्याबाबत कळवावे. तसेच कौन्सिल विभागाकडून यापुढे दखल घेतली जाईल, असे स्पष्ट केले.