For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कार पार्किंग शुल्क वसुलीत मनपाचे लाखोंचे नुकसान

10:28 AM Jan 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
कार पार्किंग शुल्क वसुलीत मनपाचे लाखोंचे नुकसान
Advertisement

अर्थ-कर स्थायी समिती बैठकीत आरोप : तातडीने निविदा काढण्याची सूचना

Advertisement

बेळगाव : बापट गल्ली आणि क्लब रोडवरील पार्किंग शुल्क वसूल करण्यात महापालिकेच्या  अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षाबद्दल महापालिकेला सुमारे 50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याला महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जबाबदार धरत शुक्रवारच्या अर्थ व कर स्थायी समिती बैठकीत अध्यक्ष व सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर तातडीने दोन्ही पार्किंग स्थळांसाठी निविदा काढण्याची सूचनाही बैठकीत करण्यात आली. शुक्रवारी महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात अर्थ व कर स्थायी समितीची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी रेखा हुगार होत्या. सुरुवातीला कौन्सिल सेक्रेटरी प्रियांका विनायक यांनी उपस्थितांचे स्वागत करत विशेष पत्रिकेवरील पत्रिकेचे वाचन केले. यावेळी प्रामुख्याने बापट गल्ली, क्लब रोड आणि पोलीस लाईन येथील महापालिकेच्या मालकीच्या पार्किंग स्थळांचा विषय चर्चेत आला. शहराच्या मध्यभागी असलेल्या बापट गल्ली कार पार्किंगचा ठेका संपून दोन वर्षे उलटली तरीही एकाकडून तब्बल दोन वर्षे पार्किंग शुल्क वसूल करण्यात आले.

याची कल्पना अधिकाऱ्यांना आहे की नाही, यामुळे महानगरपालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत कोणती कारवाई केली? अशी विचारणा करण्यात आली. त्यावेळी संबंधितांवर खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची तयारी करण्यात आली होती. त्यामुळे 10 लाख रुपये वसूल झाले आहेत. उर्वरित पैशांच्या वसुलीसाठीही प्रयत्न केले जातील, असे सांगण्यात आले. पोलीस लाईन येथील पार्किंगचाही ठेका संपला असला तरी नवीन टेंडर काढण्यात आला नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. पूर्वीच्या रकमेपेक्षा 10 टक्के वाढ करून नवीन ठेका काढण्यात यावा, अशी सूचना करण्यात आली. अन्यथा याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरत नगरविकास खात्याकडे तक्रार करण्यासह सर्वसाधारण सभेत हा विषय घेण्याचा इशारा देण्यात आला. त्यावेळी नूतन महसूल उपायुक्त डॉ. सिद्दू हुल्लोळी यांनी याबाबत अभ्यास करण्यास मला थोडा वेळ द्या, यावर योग्य ती कार्यवाही करू, त्यानंतर पुढील सर्वसाधारण सभेत सदर विषय घेण्यात यावा, अशी विनंती केली. यानंतर तातडीने पार्किंग शुल्क वसुलीसाठी निविदा काढण्याची सूचना करण्यात आली.

Advertisement

मनपाच्या मालकीचे वीस कँटिलिव्हर

शहरात महानगरपालिकेच्या मालकीचे वीस कँटिलिव्हर आहेत. त्यांचा ताबा मनपाकडून घेण्यात आला आहे. मात्र त्यावर काही जणांकडून बेकायदेशीररित्या जाहिरातबाजी केली जात आहे. त्या माध्यमातून महापालिकेला कोणतेही उत्पन्न मिळत नाही. याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष आहे की नाही? असा सवाल उपस्थित करण्यासह संबंधितांना नोटीस जारी का केली नाही? असाही प्र्रश्न उपस्थित करण्यात आला. कँटिलिव्हरचा ताबा घेतला असला तरी त्यावर जाहिरातबाजी करणाऱ्यांकडून कशापद्धतीने कर आकारणी करावी, याबाबत नियमावली ठरवून द्यावी, अशी विनंती अधिकाऱ्यांनी बैठकीत केली.

शुल्क वसुलीसाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती

सध्या बापट गल्लीत कार पार्किंगच्या ठिकाणी शुल्क वसूल करण्यासाठी महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांची सकाळी आणि संध्याकाळी नियुक्ती करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात 79 हजार तर डिसेंबर महिन्यात 26 हजार रुपयांचे शुल्क वसूल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. टिळकवाडी क्लबचा विषयदेखील यावेळी चर्चेत आला. क्लबचे मेजरमेंट काढण्यात आले असून थोडा फरक आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कँटिलिव्हरवर अतिक्रमण  करून लावण्यात आलेले फलक काढण्यासाठी कंत्राटीपद्धतीवर कामगार घेण्यासह वाहनही घेणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. यावेळी सत्ताधारी गटनेते हणमंत कोंगाली, सदस्य संतोष पेडणेकर, सारिका पाटील, जयंत जाधव, रमेश मैल्यागोळ यांच्यासह सदस्य, प्रशासन उपायुक्त उदयकुमार तलवार व अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.