गणेशोत्सवासाठी महानगरपालिका सज्ज!
विसर्जन तलावांच्या स्वच्छतेसह रंगरंगोटीचे काम हाती
त. भा. प्रतिनिधी / बेळगाव
गणेशोत्सव केवळ 21 दिवसांवर येऊन ठेपला असल्याने महानगरपालिकेकडून आवश्यक तयारी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शहर आणि उपनगरात 370 हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. सदर मंडळांच्या गणेशमूर्तींचे वेगवेगळ्या 9 तलावांमध्ये विसर्जन केले जाते. त्यामुळे विसर्जन तलावांची स्वच्छता आणि रंगरंगोटीचे काम हाती घेण्यात आले आहे. विसर्जनसाठी आवश्यक क्रेन व इतर व्यवस्था उपलब्ध केली जाणार आहे. त्याचबरोबर लवकरच विसर्जन मार्गावरील ख•sही बुजविण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.
पुणे आणि मुंबईच्या धर्तीवर बेळगाव शहरात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा 14 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून 25 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी आहे. 25 सप्टेंबर रोजी सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते तर काही गणेशभक्तांकडून पहिल्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, पाचव्या दिवशी, सातव्या दिवशी आणि अकराव्या दिवशी गणेशमूर्ती विसर्जन केल्या जातात. या काळात नागरिकांच्या घरात मोबाईल टँकर पाठवून त्यामध्ये श्रीमूर्तींचे विसर्जन करण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या हद्दीतील 9 विसर्जन तलावांच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले असून रंगरंगोटी करून विसर्जनासाठी तलाव सज्ज करून दिले जाणार आहेत. तलाव स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
जुन्या कपिलेश्वर तलावात 110, नवीन कपिलेश्वर तलावात 180, जक्कीन होंड 150, अनगोळ लाल तलाव 9, कलमेश्वर तलाव जुनेबेळगाव 32, ब्रह्मदेव मंदिर मजगाव 650, नाझर कॅम्प वडगाव 500, किल्ला तलाव 30, कणबर्गी तलावात 36 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचे सामर्थ्य आहे. सदर तलावांची स्वच्छता आणि रंगकाम करण्यासाठी महानगरपालिकेकडून 53 लाख 10 हजार रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. विसर्जन मार्ग असलेल्या धर्मवीर संभाजी चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, पाटील गल्ली, कपिलेश्वर उ•ाण पूल आणि तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ख•s बुजविण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.
मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी क्रेनची व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी 21 लाख 10 हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. विसर्जन दिवशी नवीन कपिलेश्वर तलावात 4, जुने कपिलेश्वर तलावात 3, जक्कीन होंडमध्ये 3, अनगोळ लाल तलाव, कलमेश्वर तलाव जुने बेळगाव, ब्रह्मदेव मंदिर मजगाव, किल्ला तलाव, कणबर्गी तलाव या ठिकाणी प्रत्येकी 1 क्रेनची व्यवस्था करण्यात येणार आहे.
श्री गणेशमूर्तींचे व्यवस्थितरित्या विसर्जन व्हावे यासाठी तलाव परिसरात मंडप उभारण्यात येणार असून आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. त्याचबरोबर लाऊड स्पिकरच्या माध्यमातून नागरिकांना सूचना केली जाणार आहे. कपिलेश्वर नवीन तलाव, जुना तलाव जक्कीन होंड या ठिकाणी 20 जीवरक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. विसर्जन मार्गावरील अडचणीच्या ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या आणि खाली लोंबकळणाऱ्या वीज वाहिन्या हटविल्या जाणार आहेत. विसर्जन काळात सर्व विसर्जन तलावानजीक आणि मार्गावर केयुआयडीएफसीकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. विसर्जनावेळी तलाव आणि मिरवणूक मार्गावर मोबाईल टॉयलेटची व्यवस्था असणार आहे.
यंदाचा श्री गणेशोत्सव साजरा करण्यासाठी श्री गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करण्यासाठी आवश्यक असलेल्या मंडपाची निर्मितीसाठी आवश्यक परवानगी सरकारच्या मार्गसूचीनुसार दिली जाणार आहे. त्यासाठी महानगरपालिका, पोलीस खाते आणि हेस्कॉम यांच्याकडून टिळकवाडी, मार्केट, खडेबाजार, उद्यमबाग, कॅम्प, माळमारुती, शहापूर आणि एपीएमसी पोलीस स्थानकात एकखिडकी सुरू केली जाणार आहे. विसर्जन मिरवणूक गणेशभक्तांना व्यवस्थितरित्या पाहता यावी यासाठी महानगरपालिकेकडून धर्मवीर संभाजी चौकात प्रेक्षक गॅलरी उभारली जाणार आहे.