Municipal Corporation Election 2025: महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, सांगलीत नेत्यांच्या प्रतिष्ठतेचा प्रश्न
पालिका निवडणूक प्रभाग पध्दतीनेच होणार, सध्याचे प्रभाग 20
By : संजय गायकवाड
सांगली : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुती विरूध्द महाआघाडी अशी कडवी झुंज पहावयास मिळण्याची शक्यता आहे. पालिकेची सार्वत्रिक निवडणूक ही प्रभाग पध्दतीनेच होणार आहे.
त्यामुळे सध्याच्या 20 प्रभागातून 78 नगरसेवक निवडून जाणार की लोकसंख्येच्या तुलनेत प्रभागांची व निवडून जाणाऱ्या नगरसेवकांच्या संख्येत वाढ होणार याबाबत मनपा क्षेत्रातील सर्वच राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते यांना उत्सुकता लागून राहिली आहे.
लोकसंख्येच्या तुलनेत जर प्रभागांची संख्या वाढली तर त्यातून निवडून जाणाऱ्या नगरसेवकांची संख्या कदाचित 85 च्या आसपास होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या निवडणूका आत्तापर्यत कधी वॉर्डनिहाय तर कधी प्रभागनिहाय झाल्या आहेत. पण सिंगल वॉर्डाऐवजी चार सदस्यांचा एक प्रभाग ही संकल्पना विशेषत: भाजच्या दृष्टीने फायदेशीर ठरली आहे. त्यामुळे यंदाचीही निवडणूक ही प्रभागनिहाय होण्याची शक्यता आहे.
मागील म्हणजे 2018 च्या महापालिकेच्या निवडणुकीत पालिकेच्या 20 प्रभागातून 78 पैकी तब्बल 41 नगरसेवक हे भाजपाचे निवडून आले होते. प्रभाग पध्दतीमध्ये विरोधकांना धक्का देता येतो. नियोजन करताना अधिक सोयीचे होते. एखाद्या प्रभागात एखादा दुसरा उमेदवार कमकुमवत असला तरी अन्य दोन उमेदवारांच्या ताकदीवर इतर दोन जागा जिंकता येऊ शकतात हा अनुभव भाजपला आहे.
तसाच फायदा महाआघाडीलाही झालेला आहे. दोन्हीकडील बाजूने विचार केला तर अनेक प्रभागातील कमकुमवत असणाऱ्या काही जागा अन्य ताकदीच्या उमेदवारांच्या जीवावर जिंकून आणण्यात महायुती आणि महाविकासआघाडी या दोघांनाही शक्य झालेले आहे.
वॉर्डाच्या निवडणुकीत एका वॉर्डातून एकच नगरसेवक जिंकून जातो. शहराच्या आणि वॉर्डाच्या विकासाच्या दृष्टीने म्हंटले तर ही पध्दत योग्य आहे. पण राजकीय पक्षांच्या दृष्टीने फायदेशीर म्हणून प्रभाग पध्दतीकडे पाहिले जाते. त्यामुळे यंदाही सत्ताधारी म्हणून महायुतीकडून प्रभाग पध्दतीला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे.
नेत्यांच्या प्रतिष्ठतेचा प्रश्न
आगामी मनपा निवडणुकीत महायुती म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार सुधीर गाडगीळ, आमदार डॉ. सुरेश खाडे, मिरजेतून आमदार इद्रिस नायकवडी, सुरेश आवटी, समित कदम, सांगलीतून शेखर इनामदार, नीता केळकर, पृथ्वीराज पवार, कुपवाडमधून प्रकाश ढंग, तर महाआघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजीमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, आदी मंडळीचा तिकीट वाटपात कस लागणार आहे. दोन्हीकडून महापालिकेची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता आहे.
राज्यातील सत्तेचा फायदा कोणाला
केंद्रात व राज्याच्या सत्तेत महायुती आहे. विरोधी पक्ष म्हणून महाआघाडी आहे. आगामी मनपाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून राज्यातील सत्तेचा पुरेपुर वापर करून आगामी दोन तीन महिन्यात विकासकामांचा धडका लावला जाईल. त्यातून विरोधकांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला जाईल.
अजितदादांना किती जागा सोडणार
मनपा निवडणूकीत महायुतीकडून अजितदादा पवार यांच्या पक्षाला किती जागा सोडणार याबाबत उत्सुकता आहे. काही महिन्यापुर्वीच पवार यांनी मिरजेचे नेते व माजी महापौर इद्रिस नायकवडी यांच्या गळयात आमदारकीची माळ घातली. अनेक माजी नगरसेवकांचे पक्षप्रवेश झाले. त्यामुळे महायुती म्हणून जरी निवडणूका लढविल्या तरी अजितदादा यांच्या पक्षाला मनपा निवडणूकीत किती जागा सुटणार याबाबत कार्यकर्त्यामध्ये मोठी उत्सुकता आहे.
2018 च्या निवडणूकीतील प्रभागांची संख्या 20
- प्रभागांची संख्या 20,
- निवडून गेलेल्या नगरसेवकांची संख्या 78,
- चार सदस्यीय प्रभाग 18
- तीन सदस्यीय प्रभाग - दोन.
- खुला- 45
- अनुसुचित जाती प्रवर्ग- 11
- अनुसुचित जमाती- 1
- ओबीसी - 21
निकाल...
- भाजपा- 41
- काँग्रेस- 20
- राष्ट्रवादी- 15
- अपक्ष- 2