Mahapalika Election 2025: 19 महापालिकांची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार
राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीला ब्रेक लागला होता
कोल्हापूर : राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये ‘ड’ वर्ग 19 महापालिकांची होणारी निवडणूक चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार करण्यात येणार असल्याचे आदेश राज्य शासनाने मंगळवारी काढले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या देखरेखीखाली लवकरच आरक्षण प्रक्रिया पूर्ण केली जाईल. प्रभाग रचनेसाठी 2011 ची जनगणना गृहित धरली जाणार आहे.
ओबीसी आरक्षण, प्रभाग संख्या यांच्यामुळे राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीला ब्रेक लागला होता. कोल्हापूर, इचलकरंजी, सांगलीसह 19 महापालिकांमध्ये प्रशासकराज होते. सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच ओबीसीसह निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले. यानंतर रखडलेल्या महापालिकांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली.
राज्य निवडणूक आयोगाने नुकतेच राज्य शासनाला चार दिवसात प्रभाग रचना करण्याबाबतच्या सूचना केल्या होत्या. यानुसार राज्य शासनाने मंगळवारी राज्यातील ‘ड वर्ग 19 महापालिकेतील प्रभाग रचनेबाबत आदेश काढले. यामध्ये चार सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली आहे.
मनपा अधिनियम 1949 च्या कलम 5 मधील तरतुदीनुसार चार सदस्य परंतु तीन पेक्षा कमी नाहीत. पाच पेक्षा अधिक नाहीत इतके सदस्य निवडून येतील याची तरतूद विचारात घ्यावी, असेही आदेशात म्हटले आहे. प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त होणाऱ्या हरकतींची सुनावणी घेऊन अंतिम प्रभाग रचना केली जाणार आहे.
प्रशासकांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती
निवडणुकीची प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक होण्यासाठी प्रशासकांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांच्या समितीची नेमणूक करण्यात येणार आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माहीतगार अधिकारी, प्रभाग रचनेचा संबंध असलेला अधिकारी, नगररचनाकार, संगणक तज्ञ, प्रशासकांच्या आवश्यकतेनुसार इतर अधिकारी यांचा समावेश असेल. आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महापालिका प्रशासक तो प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना सादर करतील. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक आयोगाला पाठविला जाईल.
असे असतील नगरसेवक
कोल्हापूर महापालिकेत 81 नगरसेवक असून 20 प्रभाग होतील. शेवटचा प्रभाग 5 नगरसेवकांचा असेल. तर इचलकरंजी आता नव्याने ‘ड वर्ग महापालिका झाल्याने येथे किमान 65 नगरसेवकांची संख्या असेल. यानुसार येथे 16 प्रभाग होतील. शेवटचा प्रभाग पाच नगरसेवकांचा असेल.
चार सदस्यीय निवडणूक होणाऱ्या ‘ड वर्ग महापालिका
कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, अमरावती, सोलापूर, अहिल्यानगर, अकोला, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी, जळगाव, नांदेड, धुळे, मालेगाव, लातूर, चंद्रपूर, परभणी, पनवेल, जालना
चार टप्प्यात निवडणूक प्रक्रिया
प्रभाग रचना करणे, आरक्षण ठरविणे, विधानसभा मतदारयादीचे विभाजन करणे, प्रत्यक्ष निवडणूक घेण.