नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मनपाची कारवाई सुरूच
बेळगाव : रस्त्याच्या कडेला कचरा टाकून ब्लॅकस्पॉट तयार करणे, व्यापार परवाना न घेणे, परवान्याचे नूतनीकरण न करणे यासह इतर प्रकारे मनपाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शुक्रवारीदेखील महानगरपालिकेकडून विविध ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. सातत्याने सुरू असलेल्या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करत व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षक आणि कम्युनिटी मोबीलायझरकडून शहर व परिसरात कारवाई केली जात आहे. महानगरपालिकेकडून व्यापार परवाना घेणे बंधनकारक आहे. मात्र बहुतांश जणांकडून व्यापार परवाना घेण्यापूर्वीच व्यवसाय केले जात असल्याचे गंभीर प्रकार उघडकीस येत आहेत.
तर अनेक जणांकडून व्यापार परवान्याचे नूतनीकरणही करण्यात आलेले नाही. त्यामुळे ही बाब मनपाकडून गांभीर्याने घेण्यात आली आहे. व्यापार परवाना घेताना घनकचरा व्यवस्थापन शुल्क म्हणून पैशाची आकारणी केली जाते. त्या मोबदल्यात मनपाकडून दररोज कचऱ्याची उचल केली जाते. पण काही जणांनी कचरा व्यवस्थापन शुल्कही भरलेले नसल्याचे समोर येत आहे. रस्त्याच्या कडेला कचरा टाकणे गुन्हा पात्र आहे, हे माहित असतानाही काही जणांकडून रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात आहे. त्यामुळे संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. शुक्रवारी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासह व्यापार परवाना नूतनीकरण करण्याच्या माध्यमातून शुल्क वसूल करण्यात आले.