व्यापार परवान्यासाठी मनपाकडून जागृती सुरूच
कसई गल्लीसह परिसरातील आस्थापनांना भेटी
बेळगाव : व्यापार परवाना घेण्यासह त्याचे नूतनीकरण करून घेण्यासंदर्भात मनपाच्या आरोग्य विभागाकडून शहरात जोरदार जनजागृती केली जात आहे. गुरुवार दि. 9 रोजी आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कसई गल्लीसह परिसरातील विविध हॉटेल्स व व्यापारी आस्थापनांना भेटी देऊन परवान्याची तपासणी केली. व्यावसायिकांनी महापालिकेचा व्यापार परवाना घेणे बंधनकारक आहे. पण शहरातील हजारो व्यावसायिकांनी व्यापार परवानाच घेतलेला नाही. ज्यांनी घेतला आहे त्यांनी त्याचे नूतनीकरण केलेले नाही. त्यामुळे महापालिकेला या माध्यमातून मिळणारा महसूल कमी झाला आहे. यासाठी महापालिका आयुक्त शुभा बी. स्वत: रस्त्यावर उतरल्या आहेत.
बुधवारी बाजारपेठेतील विविध दुकानांना भेटी देऊन त्यांनी पाहणी केली. त्यावेळी मुख्य बाजारपेठेतील सुमारे 4 हजारांहून अधिक व्यावसायिकांनी महापालिकेकडून व्यापार परवाना घेतला नाही, तर घेतलेल्यांनी वेळेत नूतनीकरण केले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेत मनपा आयुक्तांनी संबंधित व्यावसायिकांना तातडीने व्यापार परवाना घ्यावा व मुदत संपली असेल तर नूतनीकरण करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिल्याने विनापरवाना व्यवसाय करणारे व्यावसायिक धास्तावले आहेत. अधिकाऱ्यांनाही आयुक्तांनी रडारवर ठेवले असल्याने आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंबर कसल्याचे दिसून येत आहे. कचरा उचल करणाऱ्या वाहनांच्या लाऊडस्पीकरच्या माध्यमातून व्यापार परवान्याबाबत जागृती केली जात आहे. गुरुवारी आयुक्त संजीव नांद्रे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सुवर्णा पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी कसई गल्लीसह परिसरात पाहणी केली.