धर्मवीर संभाजी स्मारक परिसरात मनपाकडून स्वच्छता मोहीम
शिवसेना (उबाठा) पक्षाच्या निवेदनाची दखल: आठवड्यातून दोनवेळा होणार स्वच्छता
बेळगाव : धर्मवीर संभाजी महाराज चौकातील महाराजांच्या स्मारक परिसरात स्वच्छता करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे महानगरपालिकेला देण्यात आले होते. सदर निवेदनाची दखल घेत रविवारी महानगरपालिकेच्यावतीने तातडीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. त्यामुळे शिवसैनिक व शिवप्रेमीतून समाधान व्यक्त केले जात आहे. धर्मवीर संभाजी महाराज चौकातील महाराजांच्या स्मारकालगत निर्माण झालेल्या अस्वच्छतेसंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महापालिकेचे साहाय्यक पर्यावरण अभियंता हणमंत कलादगी यांना नुकतेच निवेदन देण्यात आले होते.
सदर निवेदनाची दखल घेत तातडीने रविवारी धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मारकालगत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, उपशहर प्रमुख राजू तुडयेकर, प्रवीण तेजम, प्रदीप सुतार, अमर कडगावकर आदी उपस्थित होते. आठवड्यातून दोनवेळा यापुढे महाराजांच्या स्मारकाची स्वच्छता केली जाईल, असे आश्वासन मनपा अधिकाऱ्यांनी दिले, तसेच या ठिकाणी पुन्हा अस्वच्छता निर्माण होऊ नये यासाठी स्मारकाच्या बुरुंजामागील चिंचोळी वाट बांधकाम करून बंद केले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.