For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महापालिकेकडून वस्तुस्थिती अहवाल तयार करण्याचे काम सुरु

06:40 AM Aug 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
महापालिकेकडून वस्तुस्थिती अहवाल तयार करण्याचे काम सुरु
Advertisement

त. भा. प्रतिनिधी / बेळगाव

Advertisement

तीन दिवसात वस्तुस्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रादेशिक आयुक्त कार्यालयाकडून महानगरपालिकेला देण्यात आले आहे. सदर पत्र मंगळवार दि. 18 रोजी मनपा आयुक्तांना प्राप्त झाले असून त्यांनी आपल्या विभागाला सविस्तर अहवाल तयार करण्याची सूचना केली आहे. मनपा आयुक्त कशाप्रकारचा अहवाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच महानगरपालिकेवर बरखास्तीची टांगती तलवार कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या तीन महिन्यापासून महापालिकेत पेचप्रसंग निर्माण झाला आहे. त्यामुळे विकासकामे प्रलंबित आहेत. इतकेच नव्हे तर कर्नाटकच्या बाजूने ठराव मांडला जात नाही. त्यामुळे महापालिका बरखास्त करावी अशी मागणी कन्नड संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी प्रादेशिक आयुक्तांची भेट घेऊन केली होती. सदर निवेदनाची दखल घेत प्रादेशिक आयुक्त कार्यालयाने महापालिका आयुक्तांकडून सविस्तर अहवाल मागविला आहे. पत्र मिळालेल्या तीन दिवसात वस्तुस्थिती अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. मनपा आयुक्तांकडून स्पष्टीकरण आल्यानंतर त्यावर प्रादेशिक आयुक्त सरकारला महापालिका बरखास्त करावी, असा अहवाल सादर करण्याची शक्यता आहे.

Advertisement

सोमवार दि. 17 रोजी पाठविण्यात आलेले पत्र मनपा आयुक्तांना मंगळवारी मिळाले आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या विभागाला सविस्तर अहवाल तयार करण्याची सूचना केली आहे. महानगरपालिका बरखास्त होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. महानगरपालिकेचा कार्यकाळ पूर्ण होण्यास आणखीन दोन वर्षांचा कार्यकाळ बाकी आहे. मात्र तत्पूर्वीच महापालिका बरखास्त होईल का? अशी शक्यता निर्माण झाली आहे. प्रादेशिक आयुक्तांच्या लेटर बॉम्बमुळे नगरसेवकांमध्ये खळबळ माजली असून सर्वांच्या नजरा मनपा आयुक्तांच्या अहवालाकडे लागून राहिल्या आहेत.

प्रादेशिक आयुक्त कार्यालयाकडून मनपासंबंधी वस्तुस्थिती अहवाल सादर करावा, अशा आशयाचे पाठविण्यात आलेले पत्र आपल्याला मंगळवारी प्राप्त झाले आहे. त्यानुसार विभागाला अहवाल तयार करण्याची सूचना देण्यात आली आहे. लवकरच सविस्तर अहवाल प्रादेशिक आयुक्त कार्यालयाला पाठविण्यात येईल.

-कार्तिक एम., मनपा आयुक्त

Advertisement
Tags :

.