For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कचरा डेपोसाठी पर्यायी जागांचा मनपाकडून शोध सुरू

01:11 PM Apr 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
कचरा डेपोसाठी पर्यायी जागांचा मनपाकडून शोध सुरू
Advertisement

दोन ठिकाणी पाहणी : मात्र जागांची निश्चिती नाही

Advertisement

बेळगाव : तुरमुरी येथील कचरा डेपोला परिसरातील ग्रामस्थांतून तीव्र विरोध केला जात आहे. कचरा डेपोमुळे विहिरी, कूपनलिकांचे पाणी दूषित बनण्यासह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे कचरा डेपो बंद करून दुसरीकडे स्थलांतर करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यातच 2029 मध्ये तुरमुरी कचरा डेपोचा करार संपुष्टात येणार असल्याने कचरा डेपोसाठी पर्यायी जागा शोधण्याचे काम महापालिकेकडून सुरू झाले आहे. सुरुवातीला शहरातील कचऱ्यावर खासबाग येथे प्रक्रिया केली जात होती. मात्र त्या ठिकाणी कचरा डेपोला तीव्र विरोध झाला. त्याचबरोबर नागरी वस्तीही वाढली.  त्यामुळे महानगरपालिकेकडून पर्यायी जागेचा शोध घेण्यात आला. शहरापासून काही अंतरावर असलेल्या तुरमुरी गावातील 66 एकर जागेत कचरा डेपो हलविण्याचे निश्चित करण्यात आले.

मात्र त्यावेळीही ग्रामस्थांसह परिसरातील गावांनी तीव्र विरोध केला होता. मात्र विरोध झुगारून प्रशासनाने त्या ठिकाणी कचरा डेपो सुरू केला. सदर कचरा डेपो आता पंचक्रोशीच्या मुळावर उठला आहे. शहर आणि लगतच्या ग्राम पंचायतांच्या हद्दीतील कचरा दररोज मोठ्या प्रमाणात जमा होतो. ओला, सुका, प्लास्टिक यासह तत्सम प्रकाराचा कचरा तुरमुरी कचरा डेपोत नेऊन त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या डेपोमुळे ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांचे आरोग्य आता धोक्यात आले आहे. विहिरी, कूपनलिकांचे पाणी दूषित बनत असून पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. घाणीमुळे माशांचा व डासांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे नागरिक या सर्व समस्यांमुळे हैराण झाले आहेत.

Advertisement

तुरमुरीतील कचरा डेपो बंद करून तो दुसरीकडे स्थलांतर करावा, या मागणीसाठी अलिकडेच पंचक्रोशीतील नागरिकांनी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले होते. तसेच 2029 मध्ये तुरमुरी कचरा डेपोचा करार संपुष्टात येणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून कचरा डेपोसाठी पर्यायी जागांचा शोध घेतला जात आहे. दोन ठिकाणी जागांची पाहणी केली तरीही अद्याप जागा निश्चित झालेली नाही.

Advertisement
Tags :

.