For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कन्नडिगांकडून मनपा पुन्हा वेठीस

06:55 AM Aug 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
कन्नडिगांकडून मनपा पुन्हा वेठीस
Advertisement

त. भा. प्रतिनिधी / बेळगाव

Advertisement

कर्नाटकच्या बाजूने महानगरपालिकेत ठराव मांडण्यात यावा या मागणीसाठी कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी पुन्हा एकदा मनपाला दिवसभर वेठीस धरले. कन्नडिगांनी प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केल्याने पोलीस खात्याने कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. कोणीही मनपात प्रवेश करू नये यासाठी दर्शनी आणि पाठीमागील प्रवेशद्वार कुलूपबंद केले. सायंकाळनंतर आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले.

मनपाच्या सर्वसाधारण सभेत बेळगाव कर्नाटकचा अविभाज्य घटक आहे. तसेच महाजन अहवालच अंतिम, असा ठराव मांडण्यात यावा यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने दबाव घातला जात आहे. महानगरपालिकेवर मोर्चे काढून आंदोलने केली जात आहेत. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात बैठकांचे आयोजन करावे लागत आहे. सरकार नियुक्त सदस्य आणि विरोधी गटातील नगरसेवक कर्नाटकच्या बाजूने ठराव मांडण्यात यावा यासाठी आग्रही आहेत. पण यासाठी सत्ताधारी गटाकडून सरकारकडून अभिप्राय मागण्यात आला आहे. अभिप्राय आल्यानंतर त्यावर कार्यवाही केली जाईल, असे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच कारणावरून तीन महिन्यांपासून सभा घेण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. मंगळवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समजल्यानंतर सकाळपासूनच कन्नडिगांनी मनपाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. कोणत्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्था बिघडविणारी घटना घडू नये, भाषिक सलोखा कायम रहावा यासाठी मनपा आवारात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Advertisement

त्यामुळे कन्नडिगांनी पुन्हा एकदा मनपाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केल्याने विविध कामानिमित्त येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला याचा फटका बसला. प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यासह मागील प्रवेशद्वाराला कुलूप घालण्यात आला होता. स्वत: कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बरमनी लक्ष ठेवून होते. सायंकाळनंतर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले. यावेळी पहिल्यांदाच मनपाच्या प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर बसविण्यात आले होते. मनपात प्रवेश करणाऱ्यांची तपासणी करूनच आत प्रवेश देण्यात येत होता.

Advertisement

.