मनपा आयुक्तांची विभागीय कार्यालयांना अचानक भेट
‘तरुण भारत’च्या वृत्ताची दखल, ई-आस्थी गैरकारभाराची घेतली माहिती
बेळगाव : महापालिकेतील महसूल विभागाच्या अनागोंदी कारभाराचा फटका मिळकतधारकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे ‘तरुण भारत’ने गुरुवारच्या अंकात ‘ई-आस्थी नको रे बाबा’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. याची गांभीर्याने दखल घेत महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी तातडीने बुधवारी कोनवाळ गल्ली आणि गोवावेस येथील विभागीय कार्यालयांना अचानक भेट देऊन ई-आस्थीची माहिती जाणून घेतली. तसेच त्या ठिकाणी आलेल्या नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेऊन अधिकाऱ्यांना ई-आस्थीसाठी आलेल्या फायली तातडीने निकालात काढण्याचा आदेश दिला.
महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी अचानक गुरुवारी कोनवाळ गल्ली आणि गोवावेस येथील विभागीय कार्यालयांना अचानक भेट देऊन ए आणि बी खात्यासंदर्भात सुरू असलेल्या प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. स्वत: कार्यालयातील खुर्चीवर बसून त्यांनी आलेल्या नागरिकांकडून माहिती जाणून घेण्यासह कागदपत्रांची पाहणी केली. महसूल अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलावून ‘फायली का पडून आहेत? विलंब होण्याचे कारण काय?’ याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा करून सक्त सूचना केली.
शहरातील विविध भागातून आलेल्या नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासह कधी फाईल दिली आहे व सध्या ती फाईल कोणत्या स्थितीत आहे, ई-आस्थी देण्यास विलंब होण्यामागील कारण काय? अशा सर्व प्रकारची माहिती त्यांनी जाणून घेतली. मनपा आयुक्त अचानक दाखल झाल्याने अधिकाऱ्यांची यावेळी भंबेरी उडाली. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची कामे करून देण्यास विलंब करू नये. सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्याने विनाकारण विलंब करून लोकांना त्रास देऊ नये अन्यथा लोकांकडून तक्रार आल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
एजंटांमार्फत आलेल्या फायलींना तातडीने ए व बी खाता दिला जात असल्याचे दिसून आल्याने आयुक्तांनी महसूल विभागातील चार अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोटीस देखील दिल्याची चर्चा आहे. एकंदरीत ई-आस्थीसाठी लोकांची होणारी हेळसांड व एजंट सक्रिय झाल्याबाबत ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध करताच महापालिका आयुक्त खडबडून जाग्या झाल्या आहेत. मिळकतधारक ई-आस्थीसाठी गेले असता त्यांना फायलींमध्ये अनेक त्रुटी असल्याचे सांगत माघारी धाडण्याचे काम सुरू आहे. मात्र, तीच फाईल एखाद्या एजंटामार्फत आल्यास कोणत्याही त्रुटी न काढता ए व बी खाता दिला जात आहे. त्यामुळे ई-आस्थी नको रे बाबा असे म्हणण्याची वेळ खरोखरच नागरिकांवर आली आहे. त्यामुळे महसूल विभागावर मेजर सर्जरी होणे अत्यंत गरजेचे आहे.