राकसकोप जलाशयाला महापालिका आयुक्तांची भेट
पाण्याचा जपून वापर करण्याचे नागरिकांना आवाहन
बेळगाव : बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाला सोमवारी मनपा आयुक्त कार्तिक एम. यांनी पाणीपुरवठा महामंडळ आणि केयुआयडीएफसी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भेट देऊन पाहणी करण्यासह आढावा घेतला. बेळगाव शहराला हिडकलसह राकसकोप जलाशयातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र यंदा उष्णता अधिक असल्याने पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यातच पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाणही वाढले आहे. एलअॅण्डटीकडून समर प्लॅन आखले जात आहे. जूनपर्यंत पाण्याची कमतरता भासणार नाही मात्र बेळगावकरांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन केले जात आहे.
राकसकोप जलाशयातून शहराला 35 एमएलडी पाणी वापरले जाते. उन्हाळ्यात कोणत्याही प्रकारे पाण्याची टंचाई भासू नये या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर सोमवारी मनपा आयुक्त कार्तिक एम. यांनी पाणीपुरवठा महामंडळ आणि केयुआयडीएफसी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जलाशयाला भेट देऊन माहिती जाणून घेतली. यावेळी सध्या उपलब्ध असलेले पाणी उन्हाळ्यासाठी पुरेसे आहे. पाण्याची कोणतीही कमतरता भासणार नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आयुक्तांना दिली. पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यात कोणत्याही प्रकारे व्यत्यय येणार नाही याची दक्षता घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी एलअॅण्डटीचे व्यवस्थापक धीरज उभयकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.