खासबाग निराश्रीत केंद्राला मनपा आयुक्तांची भेट
बेळगाव : खासबाग येथील निराश्रीत केंद्राला महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी सोमवार दि. 3 रोजी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी निराश्रीत केंद्रामध्ये राहणाऱ्यांशी चर्चा केली. केंद्रात मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेत रोजगार करून कुटुंबासह पुनर्वसन करण्यास इच्छुक असणाऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन मनपा आयुक्तांनी निराश्रीतांना दिले. महानगरपालिकेच्या आश्र्रयाखाली खासबाग येथे सुरू असलेल्या निराश्रीत गृहाला सोमवारी महापालिका आयुक्तांनी अचानक भेट दिली. त्या ठिकाणी आश्र्रय घेतलेल्यांशी त्यांनी आपुलकीने चर्चा केली. कोणत्या कारणास्तव निराश्रीत व्हावे लागले, याचीही माहिती घेतली. केंद्रात मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेत जे निराश्रीत काम करून पुन्हा कुटुंबीयासह पुनर्वसन करण्यास तयार आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. त्याचबरोबर केंद्रात देण्यात येणाऱ्या अन्नपुरवठा आणि स्वच्छतेबाबतही त्यांनी कौतुक केले. तसेच या केंद्रात आवश्यक कामे तातडीने हाती घेण्याची सूचनाही मनपा आयुक्तांनी केली.