'लजिज बिर्याणी' वर पालिकेची कारवाई
सातारा :
खासदार उदयनराजे यांच्या अत्यंत जवळचे व साताऱ्यात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या लजिज बिर्याणी हाऊस या हॉटेलचे मालक मुक्तार पालकर यांनी सातारा पालिकेचा 1 लाख 26 हजार 554 रुपयांचा कर थकवला होता. तसेच तेथील स्थानिकांनी हॉटेलचा कचरा गटारात टाकला जातो. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे पालिकेचा वसुली विभाग आणि आरोग्य विभागाची दोन पथके हॉटेलला सील ठोकण्यासाठी पोलीस बंदोबस्तात गेली होती. पालिकेच्या पथकांना पाहताच हॉटेलचे मालक पालकर यांचा पारा चढला. त्यांनी अधिकाऱ्यांशी अगोदर हुज्जत घातली. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी समजूत घातल्यानंतर त्यांनी थकबाकीच्या रकमेचा धनादेश दिला. तसेच गटरबाबत व कचऱ्याबाबत व्यवस्था करतो, असे स्टॅम्प पेपरवर लिहून दिल्याने तुर्तास टाळे ठोकण्याची टळली आहे.
सातारा पालिका वसुलीच्याबाबत आक्रमक झाली आहे. नागरिकांनी वेळेत कर भरावा. पालिका त्यांना सोयीसुविधा देण्यास कुठेही कमी पडत नाही, असे वारंवार पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट सांगत असतात. मात्र, काही बडे थकबाकीदार हे पालिकेच्या अधिकाऱ्यांना बेरजेत धरत नाहीत. आपले कोणी काही करु शकत नाही, या आर्विभावात असतात. मात्र, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट या सगळ्यांचा हिशोब दररोज डोक्यात ठेवत असतात. त्यांनी पालिकेच्या आरोग्य विभाग आणि वसुली विभागाला गुरुवार परजावरील लजिज बिर्याणी हाऊसवर कारवाई करण्यासाठी पोलीस बंदोबस्त घेऊन आदेश दिले. लजिज बिर्याणी हाऊसचे मालक मुक्तार पालकर हे खासदार उदयनराजे यांचे कट्टर कार्यकर्ते, त्यांच्या अतिशय जवळचे अशी त्यांची ओळख असल्याने आजपर्यंत त्यांच्या हॉटेलवर कोणत्याही पालिकेच्या अधिकाऱ्यांची कारवाईची हिम्मत झाली नव्हती. परंतु मुख्याधिकारी अभिजित बापट यांचा आदेश मिळताच वसुली विभागाचे प्रमुख उमेश महादार आणि आरोग्य विभागाचे प्रमुख प्रकाश राठोड हे पोलीस घेवून दुपारी पावणे बारा वाजता हॉटेलला सील ठोकण्याच्या उद्देशाने गेले. पालिकेचे पथक हॉटेलला टाळा लावायला आल्याचे पाहून हॉटेलचे मालक मुक्तार पालकर यांनी आक्रमकपणे अधिकाऱ्यांना विरोध करण्यास सुरुवात केली. राठोड आणि महादार यांनी त्यांना समजूतदारपणे त्यांच्या थकबाकीचा व हॉटेलबाबत आलेल्या तक्रारीचा पाढाच वाजताच मुक्तार पालकर यांनी वरिष्ठ अधिकारी पालिकेत आता कोण आहेत? त्यांना येथे बोलवा, असा हट्ट केला. त्यावरुन अतिरिक्त उपमुख्याधिकारी अरविंद दामले यांना बोलवले. दामले यांनी त्यांना बिल भरावे लागेल. तुम्हाला नागरिकांच्या तक्रारीनुसार उपाययोजना कराव्या लागतील, अन्यथा आम्हाला कारवाई करणे क्रमप्राप्त आहे, असे सांगितले. त्यावरुन तब्बल पाऊण तासाच्या तणावपूर्ण वातावरणांती पालककर यांनी थकबाकी असलेल्या रकमेचा 1 लाख 26 हजार 554 रुपयांचा चेक दिला. तसेच स्टॅम्प पेपरवर दोन दिवसात गटरची व कचऱ्याची व्यवस्था करतो, अशी लेखी हमी दिली. त्यामुळे पालिकेची ही कारवाई तुर्तास थांबवली गेली आहे. या कारवाईत वसुली विभागाचे प्रमुख उमेश महादार, कर वसुली अधिकारी जगदीश मुळे, पियुष यादव, राहुल आवळे, प्रभाकर रणदिवे, मिलिंद सहस्त्रबुद्धे, आरोग्य विभागाचे प्रमुख प्रकाश राठोड, सागर बडेकर, प्रशांत गंजीवाले, गणेश काकडे, राकेश गलियाल, मुकादम अनिल कांबळे आदी सहभागी झाले होते.
- मुख्याधिकारी बापटांचा दे धक्का
थकबाकीदारांनी लवकरात लवकर थकबाकी भरावी अन्यथा मुख्याधिकारी अभिजित बापट हे कारवाई करण्यासाठी वसुली विभाग, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभाग, अतिक्रमण हटाव विभागालाही आदेश देतील आणि कारवाई करायला लावतील, एकदाची कारवाई झाली तर पुन्हा तारांबळ नको. त्यामुळे थकबाकी असेल तर ती लवकरात लवकर भरावी, नाहीतर मुख्याधिकारी अभिजित बापट असा दे धक्का देतील, अशी चर्चा सातारा शहरात सुरु होती.