मुनाफ पटेल दिल्लीचा गोलंदाजी प्रशिक्षक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा माजी वेगवान गोलंदाज मुनाफ पटेल याची दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएलच्या येत्या मोसमात तो संघासमवेत असेल.
41 वर्षीय मुनाफ प्रमुख प्रशिक्षक हेमांग बदानी व डीसीचे डायरेक्टर ऑफ क्रिकेटचे वेणुगोपाल राव यांच्यासमवेत काम पाहिल. 2018 मध्ये मुनाफ व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्त झाला. कारकिर्दीत पहिल्यांदाच तो प्रशिक्षकपदाची भूमिका बजावणार आहे. यावर्षी झालेल्या आयपीएलनंतर प्रमुख प्रशिक्षक रिकी पाँटिंग व गोलंदाजी प्रशिक्षक जेम्स होप्स यांनी आपली पदे सोडल्यानंतर होप्सच्या जागी मुनाफ पटेलची निवड करण्यात आली आहे.
मुनाफने भारताच 86 आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रतिनिधित्व करीत 125 बळी मिळविले. 2011 मध्ये भारताने वनडे वर्ल्ड कप जिंकला होता, त्या संघाचा मुनाफ पटेल हाही सदस्य होता. याशिवाय 2008 मध्ये राजस्थान रॉयल्सने व 2013 मध्ये मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धा जिंकली होती, त्या संघांतूनही मुनाफ पटेल खेळला होता.
दिल्ली कॅपिटल्सने अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स व अभिषेक पोरेल या चार खेळाडूंना आगामी मोसमासाठी संघात कायम ठेवले आहे. 24 व 25 नोव्हेंबर रोजी जेद्दाह येथे आयपीएलचा मेगा लिलाव होणार आहे, त्यासाठी दिल्ली कॅपिटल्सला 73 कोटी रुपये खर्च करता येणार आहेत. दिल्लीला आणखी दोन खेळाडूंना करण्याची संधी राईट टु मॅच (आरटीएम) द्वारे मिळणार आहे. कॅप्ड व अनकॅप्ड किंवा दोन कॅप्ड खेळाडू ते निवडू शकतात.