For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबईच्या वैभवची सुवर्णासह पदकांची हॅट्ट्रिक

06:00 AM May 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
मुंबईच्या वैभवची सुवर्णासह पदकांची हॅट्ट्रिक
Advertisement

पहिली खेलो इंडिया बीच स्पर्धा, दिव 2025 : महाराष्ट्राला कबड्डीत कांस्यपदक, पदकतक्त्यात दुसरे स्थान

Advertisement

वृत्तसंस्था/दिव

माथाडी कामगाराचा मुलगा असणाऱ्या वैभव वाल्मिक काळेने पहिल्या खेलो इंडिया बीच स्पर्धेत महाराष्ट्रासाठी पदकांच्या हॅट्ट्रिकचा पराक्रम केला आहे. वैभवने  सुवर्ण, रौप्य व कांस्य अशी तिरंगी पदके जिंकण्याचा करिश्मा घडविला आहे. कबड्डी महाराष्ट्राच्या दोन्ही संघांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले असून पदकतक्त्यात 5 सुवर्णांसह एकूण 18 पदके जिंकून महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. घोघला समुद्र किनाऱ्यावर सुरु असलेल्या पारंपारिक पेंचक सिलट प्रकारात महाराष्ट्राच्या वैभव काळेने सुवर्ण पदक जिंकून पदकाच्या हॅट्ट्रिकने सुवर्णसांगता केली. 60 ते 65 किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या 23 वर्षीय वैभवने आसामच्या प्रांजल राभा विरूध्द 17-4 गुणांनी एकतर्फी विजय मिळविला. वैभवचे हे स्पर्धेतील तिसरे पदक आहे. वैयक्तिक प्रकारात कांस्य, रेंगु सांघिक प्रकरात रौप्य पदकाची लयलूट वैभवने केली आहे. स्पर्धेत तिरंगी पदक जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे. वैभवचे वडिल वाल्मिक काळे हे मुंबईतील वाशी बाजार समितीत माथाडी कामगार आहेत. ठाणे शहरात सराव करणाऱ्या वैभवने आशियाई स्पर्धेत रौप्य पदक पटकावले असून जागतिक स्पर्धेत त्याने भाग घेतला आहे.

Advertisement

कबड्डीत महाराष्ट्राला कांस्य

बीच कबड्डीतील महिला उपांत्य लढतीत हिमाचल प्रदेशने महाराष्ट्राचा 52-41 गुणांनी पराभव केला. साखळी सामन्यात छत्तीसगड, दीव व दमन संघाचा धुव्वा उडवून महाराष्ट्राने उपांत्य फेरीत मजल मारली होती. पूर्वार्धात महाराष्ट्राचे आक्रमण ढसाळ झाल्याने हिमाचल प्रदेशने 28-17 अशी 11 गुणांची आघाडी घेतली होती. उत्तरार्धात गार्गी साखरे, हर्षा शेट्टी यशस्वी चढाया केल्या. आघाडी कमी होऊ शकली नसल्याने महाराष्ट्राला पराभव स्वीकारावा लागला. पुरूषांच्या उपांत्य लढतीत हरियाणाने महाराष्ट्रावर 52-27 गुणांनी मात केली.  दोन्ही गटातील सुवर्णपदके बलाढ्या हरियाणाने जिंकून आपले वर्चस्व गाजवले. बीच सॉकरमधील पुरूष गटात महाराष्ट्राला 3-16 गोलने पराभूत करून केरळने अंतिम फेरीत मजल मारली आहे. पदकतक्त्यात 5 सुवर्ण, 4 रौप्य, 9 कांस्य एकूण 18 पदके जिंकून महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. 5 सुवर्ण, 5 रौप्य, 3 कांस्य एकूण 13 पदकांची कमाई करीत मणिपूरने अव्वल स्थान गाठले आहे. सर्वसाधारण विजेतेपदासाठी मणिपूर, महाराष्ट्र आणि हरियाणात शर्यत रंगली आहे.

Advertisement
Tags :

.