For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

'नशामुक्त बेळगाव'अभियानात मुंबईच्या 'अम्मा'चे आव्हान

07:29 AM Jul 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
 नशामुक्त बेळगाव अभियानात मुंबईच्या  अम्मा चे आव्हान
Advertisement

अमलीपदार्थ विक्री-सेवनावर बहुतांश निर्बंध, मात्र सायन-कोळीवाड्यातून पुरवठा सुरूच, परप्रांतीय गुन्हेगारांमुळे पायबंद घालण्यात अडथळे

Advertisement

नशामुक्त बेळगावसाठी बेळगाव पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. परराज्यातून पुरवठा होणारा गांजा, अफिम, हेरॉईन, पन्नी जप्त करून ते नष्ट केले जात आहेत. स्थानिक पोलिसांबरोबरच सीसीबीनेही अमलीपदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध आघाडी उघडली आहे. मात्र, बेळगावला हेरॉईन पुरवणाऱ्या ‘अम्मा“ला ताब्यात घेण्याचे आव्हान पोलीस दलासमोर उभे ठाकले आहे.

त. भा. प्रतिनिधी

Advertisement

बेळगाव : बेळगाव शहरात अमलीपदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांचे कंबरडे मोडून पुरवठादारांची साखळी तोडण्याचे काम पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्या पुढाकारातून हाती घेतले आहे. अमलीपदार्थांची विक्री व सेवन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याची सूचना पोलीस आयुक्तांनी आपल्या अधिकाऱ्यांना केली आहे. त्यानुसार कारवाईही सुरू झाली असली तरी मुंबई येथील ‘अम्मा“चे मात्र पोलीस दलासमोर मोठे आव्हान आहे.

परराज्यातील अमलीपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई

कोल्हापूर, सांगली, परळीसह महाराष्ट्रातील विविध भागातून बेळगावला गांजा पुरवठा होत होता. या पुरवठादारांची साखळी तोडण्यासाठी परराज्यातील अमलीपदार्थ विक्रेत्यांवर बेळगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. गांजा जसा महाराष्ट्रातून येतो तसे अफिम राजस्थानमधून पुरवठा केले जाते. हेरॉईन व पन्नीचा पुरवठा मुंबईतून होतो.

बेळगाव येथील खडेबाजार, मार्केट, शहापूर, टिळकवाडी, काकतीसह विविध पोलीस स्थानकात हेरॉईनसंबंधी दाखल झालेल्या एफआयआरमध्ये ‘अम्मा“ हे नाव आहेच. सुमारे 15 हून अधिक ठिकाणी सायन-कोळीवाड्यातील ‘अम्मा“ या नावाचा उल्लेख झाला आहे. बेळगावात हेरॉईन विक्री करताना ज्यांना ज्यांना अटक झाली आहे, त्यांनी ‘अम्मा“च्या नावाचा उल्लेख करीत आम्ही मुंबईतून हा साठा बेळगावात आणल्याची कबुली दिली आहे.

‘अम्मा“ला अटक करण्यासाठी बेळगाव पोलिसांची धडपड

सायन-कोळीवाड्याच्या ‘अम्मा“ला अटक करण्यासाठी बेळगाव पोलिसांची धडपड सुरू असली तरी तिच्यापर्यंत पोहोचणे यंत्रणेला शक्य होत नाही, अशी परिस्थिती आहे. प्रत्यक्षात सायन-कोळीवाडा परिसरात हेरॉईनची विक्री करणारे अनेक जण आहेत. महिलांची संख्याही मोठी आहे. तामिळ कॉलनीत राहणाऱ्या अनेक महिला हेरॉईनची विक्री करतात. यापैकी अनेक जणी ‘अम्मा“ या नावानेच ओळखल्या जातात.

अधूनमधून ‘अम्मा“ ऐवजी हेरॉईन पुरवठा करणाऱ्यांच्या यादीत संतोष व इतर नावांचाही उल्लेख होतो. बेळगावला मुंबईमधूनच मोठ्या प्रमाणात हेरॉईनचा पुरवठा होतो. खास करून शिक्षण संस्थांजवळ फिरून त्याची विक्री केली जाते. विक्री करणाऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले असले तरी सायन-कोळीवाडामधून बेळगावला होणारा पुरवठा थांबवण्याचे मोठे आव्हान पोलीस दलासमोर उभे ठाकले आहे.

वेगवेगळ्या गिरण्यांमध्ये काम करण्यासाठी तामिळनाडूतून आलेल्या नागरिकांची सायन-कोळीवाडा येथे वसती आहे. या तामिळ वस्तीतच हेरॉईन विकणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना आवर कसा घालायचा? हा पोलीस दलासमोरचा मोठा प्रश्न आहे. अनेक प्रकरणात हेरॉईन पुरवठादार म्हणून ‘अम्मा“ हे नाव आले असले तरी ‘अम्मा“ एकटीच आहे, असे नाही. अशा अनेक ‘अम्मा“ सायनमध्ये आहेत. त्यामुळे हेरॉईन पुरवठा करणाऱ्या ‘अम्मा“चा शोध घेणे कठीण जात आहे.

यापूर्वी आंध्रप्रदेशमधील स्टुअर्टपुरम येथील दरोडेखोरांच्या टोळीने बेळगावात अनेक ठिकाणी दरोडे घातले आहेत. गुन्ह्याच्या पद्धतीवरून स्टुअर्टपुरम येथील मेंढरगुत्ती महाराजा टोळीने हे कृत्य केल्याचे अनेक प्रकरणात उघडकीस आले. बेळगाव पोलिसांचे पथक स्टुअर्टपुरमपर्यंत जाऊन आले. तरीही महाराजा किंवा त्याच्या साथीदारांपर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही.

एमडीएम, गांजा, अफिम पुरवठ्याची साखळी तोडण्यात काही प्रमाणात यश आले असले तरी हेरॉईन पुरवठादारांची साखळी तोडण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. बेळगाव हे काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय पातळीवर अमलीपदार्थांची खरेदी-विक्री करणारे प्रमुख केंद्र होते. बेळगावातून अनेक देशांना अमलीपदार्थ पाठवले जात होते. पोलीस दलाने सतत प्रयत्न करूनही या नशेच्या सौदागरांचा नायनाट करणे पूर्णपणे शक्य होत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळेच सायन-कोळीवाड्याच्या ‘अम्मा“चे आव्हान बेळगाव पोलीस कसे मोडून काढणार? याकडे बेळगावकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

Advertisement
Tags :

.