मुंबईकरांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
मुंबई : मुंबईसह राज्यातील अनेक भागात गेल्या 24 तासांमध्ये जोरदार पाऊस झाला. मुंबईतील पावसामुळे सकाळी 4 ते 7 या कालावधीमध्ये सेंट्रल रेल्वेची ठाण्यापासूनची लोकल ठप्प होती. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. ठप्प झालेली लोकल सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. तर, रस्त्यावरही पाणी साचल्यानं वाहनचालकांचे हाल होत आहेत.आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना याचा मोठा फटका बसला. मूसळधार पावसामुळे राज्यात आणि मुंबईत निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रलायातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतला.
गरज असेल तरच घराबाहेर पडा
मुंबईकरांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केलं. मुंबईतील रस्त्यांवर पाणी ओसरलं आहे. पावसाच्या साचलेल्या पाण्याचा निचरा होत आहे.मुंबईतील सखल भागात महापालिका आणि रेल्वेने पाणी उपसण्यासाठी पंप बसवले होते. या सर्व उपायांमुळे पाण्याचा निचरा होऊन रेल्वे सेवा सुरळीत होत आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. हार्बर आणि मध्य रेल्वेची सेवा सुरळीत झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.