For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Mumbai Rains Weather | मुंबईकरांनो सावधान! पुढच्या काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता; IMD कडून ऑरेंज अलर्ट जारी

11:03 AM Jun 24, 2026 IST | NEETA POTDAR
mumbai rains weather   मुंबईकरांनो सावधान  पुढच्या काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता  imd कडून ऑरेंज अलर्ट जारी
Mumbai Rains Weather
Advertisement

मुंबई : तब्बल पंधरा दिवस उशिराने दाखल झालेल्या मान्सूनने अखेर मुंबई महानगर प्रदेशात दमदार पुनरागमन केले असून गेल्या काही तासांत मुंबई, उपनगर, ठाणे, नवी मुंबई, वसई- विरार आणि पालघर परिसरात मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झाले असून रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

Advertisement

पश्चिम उपनगरातील अंधेरी सबवेमध्ये तीन ते चार फूट पाणी साचल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दादर, माटुंगा तसेच दक्षिण मुंबईतील काही सखल भागांमध्येही पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली. दादर पूर्व परिसरात झाड कोसळल्याची घटनाही घडली.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवेलाही फटका बसला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल गाड्या १५ ते २० मिनिटांच्या विलंबाने धावत असल्याने सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. वाशी-ठाणे ट्रान्सहार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. कोपरखैरणे आणि घणसोलीदरम्यान रेल्वे मार्गाखालची माती वाहून गेल्याने सेवा थांबवावी लागली होती. मात्र पावसाचा जोर कमी झाल्यानंतर दोन्ही मार्गिका पुन्हा सुरू करण्यात आल्या असून सध्या वेगमर्यादेसह वाहतूक सुरू आहे.

Advertisement

मुंबई महानगरपालिकेने पुढील काही तासांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून मुंबई आणि पालघर परिसरात विजांचा कडकडाट तसेच ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पुढील 3 तासात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि सिंधुदुर्गात पुढील तीन तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील तीन तासासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आली आहे.

कोकणात पावसाचा अंदाज काय?
रायगड जिल्ह्याला आजसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उद्यापासून पुढचे चार दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट म्हणजेच अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. तर उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसचे त्यापुढचे तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला उद्यासाठी पावसाचा यलो अलर्ट आहे तर त्यापुढचे दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.