For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबईने 27 वर्षानंतर जिंकला इराणी चषक

06:00 AM Oct 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुंबईने 27 वर्षानंतर जिंकला इराणी चषक
Advertisement

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मुंबईने घडवला इतिहास : पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मारली बाजी,ऋतुराज गायकवाडचे ‘बॅड’लक,द्विशतकवीर सरफराज खान सामनावीर

Advertisement

वृत्तसंस्था/लखनौ

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाने लखनौच्या एकाना स्टेडियमवर शेष भारताचा पराभव करून प्रतिष्ठेच्या इराणी चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तब्बल 27 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मुंबईला हे यश मिळाले आहे. इराणी चषक जिंकण्याची मुंबईची ही 15 वी वेळ आहे. सर्वाधिक इराणी कप जिंकण्याचा विक्रमही मुंबई संघाच्या नावावर आहे. यापूर्वी 1997-98 साली संघानं ही स्पर्धा जिंकली होती. विशेष म्हणजे, पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबईने इराणी चषकावर कब्जा केला. नाबाद द्विशतकी खेळी साकारणाऱ्या सरफराज खानला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Advertisement

रणजी विजेत्या मुंबईने पहिल्या दिवसापासूनच आपले वर्चस्व कायम राखत पहिल्या डावात 537 धावांची मजल मारली. सरफराज खानने नाबाद 222 धावांची खेळी करत प्रथम श्रेणी क्रिकेटमधील चौथे द्विशतक झळकावले. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीला कर्णधार रहाणेनं चांगली साथ दिली. रहाणेने 97 धावांची खेळी केली. शेष भारत संघाच्या गोलंदाजीचा चिवटपणे सामना करणाऱ्या रहाणेचे शतक अवघ्या तीन धावांसाठी हुकले. या जोरावर मुंबईने धावांचा डोंगर उभा केला.

प्रत्युत्तरादाखल पहिल्या डावात शेष भारताने चांगली लढत दिली. अभिमन्यू ईश्वरनने 191 धावांची शानदार खेळी करत आघाडी घेतली. ध्रुव जुरेलने 93 धावांचे योगदान दिले. मात्र, मुंबईच्या गोलंदाजांनी वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाजांनी टिच्चून मारा करत शेष भारत संघाला 416 धावांवर रोखण्यात यश मिळवलं. त्यामुळे मुंबईला पहिल्या डावात 121 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. तीच मुंबईच्या विजयात निर्णायक ठरली. अर्थात, ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील संघाचे दिग्गज खेळाडू या सामन्यात सपशेल अपयशी ठरले.

पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबई अजिंक्य

सामन्याच्या चौथ्या दिवशी शेष भारताला 416 धावांत रोखल्यानंतर मुंबईने 6 बाद 153 धावा केल्या होत्या. याच धावसंख्येवरुन त्यांनी पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. पहिल्या डावातील द्विशतकवीर सरफराज खान 17 धावा काढून तंबूत परतला. शार्दुल ठाकूरलाही फारसा चमत्कार दाखवता आला नाही. यानंतर तनुष कोटियन व मोहित अवस्थी या जोडीने नवव्या गड्यासाठी 158 धावांची भागीदारी करत संघाला त्रिशतकी मजल मारुन दिली. आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कोटियनने शतकी खेळी साकारताना 150 चेंडूत 10 चौकार व 1 षटकारासह नाबाद 114 धावा केल्या. तर अवस्थीने 93 चेंडूत नाबाद 51 धावा करत त्याला चांगली साथ दिली. यावेळी मुंबईने 78 षटकांत 8 बाद 329 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला. पाचव्या दिवसाचा खेळ संपल्यामुळे रेस्ट ऑफ इंडिया संघाला दुसऱ्या डावात फलंदाजी करता आली नाही आणि सामना अनिर्णित राहिला. मात्र मुंबईने पहिल्या डावात आघाडी घेतल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

संक्षिप्त धावफलक 

मुंबई प.डाव 537 व दुसरा डाव 78 षटकांत 8 बाद 329 घोषित (पृथ्वी शॉ 76, सरफराज खान 17, तनुष कोटियन नाबाद 114, मोहित अवस्थी नाबाद 51, सारांश जैन 6 बळी, मानव सुथार 2 बळी),शेष भारत प.डाव सर्वबाद 416

मुंबईने 27 वर्षानंतर जिंकला इराणी कप

1997 नंतर प्रथमच मुंबईने इराणी चषकाचे विजेतेपद पटकावण्यात यश मिळवले आहे. मुंबईने इराणी चषकाचे विजेतेपद पटकावण्याची ही 15 वी वेळ आहे. टीम इंडियातून बाहेर असलेल्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने अगोदर रणजी चषक आणि आता इराणी चषक उंचावला आहे.

मुंबईने देशांतर्गत जिंकलेल्या ट्रॉफींची यादी

  • रणजी ट्रॉफी - 42
  • इराणी चषक - 15
  • विजय हजारे ट्रॉफी - 4
  • सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी - 1.
Advertisement
Tags :

.