पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण
मुंबईतील पहिल्याच जोरदार पावसाने शहरातील अनेक भाग जलमय झाले. वाहतुकीची मोठी कोंडी झाली. मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या रेल्वे सेवांवरही परिणाम झाला. गेल्या 25 वर्षाहून अधिक काळ मुंबई महापालिकेत उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता होती, मात्र यावर्षी महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर भाजपची मुंबई महापालिकेत सत्ता आली. पालिकेचा कारभारी बदलल्याने याचा फायदा साहजिकच प्रशासनाने घेतला. कारभारी बदलल्याने गेली अनेक वर्षे वृक्ष छाटणी आणि मान्सूनपूर्व नालेसफाई करणारे ठेकेदारही बदलले. या बदलांमुळेच पहिल्याच पावसात पहिल्यांदाच भाजपच्या नेतृत्वाखाली मुंबईचे तीनतेरा वाजले. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये झालेल्या विविध घटनांमुळे जवळपास 13 जणांचा बळी गेला आहे.
मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी आम्ही सात अधिकाऱ्यांना निलंबित केल्याचे सांगितले. सात अधिकाऱ्यांचे निलंबन कऊन या 13 जणांचा जीव परत येणार आहे का? हेच अमित साटम गेल्यावर्षीपर्यंत विधानसभेत आणि बाहेरही मुंबई महापालिकेच्या प्रश्नावर बोलताना अधिक आक्रमक होत असत. आता त्याच घटना ते हसत हसत सांगतात हा इतकाच बदल काय तो झाल्याचे दिसले. नेमेची येतो मग पावसाळा, मुंबईकरांचा गाळात मेळा याप्रमाणे दरवर्षी मुंबईकरांची अवस्था होत आहे. अललिनोमुळे मान्सूनला विलंब झाल्याने उकाड्याने हैराण झालेला मुंबईकर पावसाची चातकाप्रमाणे वाट बघत होता, मात्र गेल्या दोन दिवसांच्या पावसानेच मुंबईकर घायकुतीला आला आहे. नेहमीप्रमाणे पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली. अनेक भागांत पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे, रेल्वे सेवांवर परिणाम होणे आणि झाडे कोसळण्याच्या घटना घडल्याने मान्सूनपूर्व कामांच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. झाड कोसळून आत्तापर्यंत तीन जणांचा मृत्यु झाला, त्यात एका शाळकरी विद्यार्थ्याचा समावेश आहे. मुंबई महापालिकेत गेली चार वर्षे प्रशासन राज होते, त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणूकीत भाजपची सत्ता आली. भाजपने सत्तेवर येताच जुने कंत्राटदार बदलले काही नवीन कंत्राटदार तयार झाले. ज्यांना कामाचा अनुभव नाही, त्यांना करोडो ऊपयांची कंत्राटे मिळाली. त्यात कशी कंत्राटे मिळवायची त्यासाठी नव्या कंपन्यांना अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन मिळतं, आता कंत्राटे तर मिळाली पण कामाचे काय. पालिकेत भाजपची सत्ता, राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता त्यात मुठभर विरोधक, मग भिती कोणाची, जसे हवे तसे निर्णय घ्यायचे जनतेला गृहित धरायचे त्याच भावनेतून सत्ताधारी काम करत असल्याने याची किंमत ही जनतेला मोजावी लागत आहे. शिवसेना ठाकरे गटाचा कारभार पारदर्शक होता असे नाही, मात्र सत्तांतर झाल्यानंतर भाजपकडून लोकांना जास्त अपेक्षा होती. भाजपसोबत शिवसेना शिंदे गट सत्तेत आहे, मात्र शिंदे शिवसेनेला
ऑपरेशन दोन तीन यामध्ये जास्त इन्टरेस्ट, एक हाती सत्ता असल्यावर तुम्हाला मनाप्रमाणे निर्णय घेता येतात. इथे मात्र सत्ताधारी दोन पक्षातच एकमत नाही, त्यामुळे मुंबईच्या नालेसफाई पाहणीचा दौरा महापौर आणि उपमहापौरांनी स्वतंत्रपणे केला आणि पालिकेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांना नेमके हेच हवे असते. जेवढे सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद तेवढा भोंगळ कारभार पहायला मिळतो. गेल्या आठवड्याभरात तब्बल 950 हून अधिक झाडं पडली. मुंबईच्या सखल भागात हिंदमाता, मिलन सब-वे, खोदादाद सर्कल ही पाणी साचणारी नेहमीची ठिकाणे, मात्र कालच्या पावसात जवळपास पूर्ण मुंबईतच पाणी साचल्याचे दिसले. याचे प्रमुख कारण म्हणजे मान्सूनपूर्व नालेसफाईची अपूर्ण कामे आहेत. केवळ कमिशनच्या जोरावर कंत्राटे मिळवायची गाळ भरलेल्या त्याच त्याच गाड्यांचे फोटो दाखवायचे आणि मलिदा लुटायचा हाच प्रकार नेहमीप्रमाणे चालू आहे. नाल्यातून गाळ काढायचा काढलेल्या गाळाचे फोटो काढायचे मात्र तो गाळ लवकर उचलायचा नाही, पुन्हा पाऊस पडल्यावर हा गाळ नाल्यात जातो. त्यामुळे दरवर्षी गाळ काढण्यासाठी करोडो ऊपये खर्च कऊनही मुंबई ही पावसाळ्यात गाळात जाते. मुंबईतून विधानसभेत प्रतिनिधित्व करत असलेले अनेक आमदार हे आधी नरगसेवक होते. आशिष शेलार, अमित साटम, पराग अळवणी, योगेश सागर, मनिषा चौधरी, अस्लम शेख, मुरजी पटेल, विद्या ठाकुर, सुनिल प्रभु, संजय पोतनीस, महेश सावंत या आमदारांना मुंबईच्या प्रश्नांची चांगली जाण आहे. गेल्या वर्षी मुंबई महापालिकांच्या निवडणूका होण्याआधी भाजपचे मुंबईतील आमदार हे महापालिकेच्या प्रश्नावऊन सभागृहात कमालीचे आक्रमक होत असत, मुंबई महापालिकेतील अनेक भ्रष्टाचारांच्या प्रकरणांना या आमदारांनी सभागृहात वाचा फोडली. अनेक चौकशा लावल्या, त्यामुळे ठाकरेंच्या पालिकेतील कारभाराची पोलखोल झाली. अनेक घोटाळे समोर आले, मात्र आता मुठभर विरोधक त्यात जे आमदार मुंबईच्या प्रश्नावर थेट चौकशीची किंवा निलंबनाची मागणी करायचे, तेच सत्तेत गेल्याने गेल्या दोन अधिवेशनात मुंबईच्या प्रकरणावर कोणती मोठी घोषणा झाली नाही. महापालिका आणि राज्यात सत्ताधारी एक असल्यास प्रकरणांना वाचा फुटली तरी त्यावर काही होत नाही, महापालिकेत आणि राज्यात सत्ताधारी वेगवेगळे असले की कंत्राटदार आणि ठेकेदारांना कोणाचा तरी धाक राहतो. महापालिकेत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट सोबतीला मनसेचे नगरसेवक त्यात शरद पवार गटाच्या एका आमदाराने शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेना उबाठा आणि मनसे पालिकेच्या कारभारावर बोलताना दिसत आहे. मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी नालेसफाईच्या कामाची पोलखोल आधीच केली होती. विरोधीपक्ष नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मान्सूनपूर्व कामाबाबत मार्चमध्ये पत्र देऊनही महापौरांनी विशेष सभा न घेतल्याचा आरोप केला. एकीकडे पालिकेतील भाजपच्या कारभारावर आरोप होत आहे, दुसरीकडे मित्रपक्षाचे सर्वोच्च नेते एकनाथ शिंदे रूग्णालयात दाखल आहेत. शिंदेंच्या पक्षातील कोणी भाजपवर होत असलेल्या आरोपाचे खंडन करताना दिसत नाही. मान्सूनपूर्व कामे प्रभावीपणे न झाल्याने मुंबईची ही अवस्था झाल्याचा आरोप शिवसेनेने केलाय. ठेकेदार बदलल्याने कामांना विलंब झाला आणि त्याचा फटका नागरिकांना बसला आहे. दुसरीकडे भाजपकडून या आरोपांचे खंडन करण्यात येत असून, अनेक वर्षे मुंबईवर सत्ता गाजवणाऱ्या शिवसेनेलाच शहराच्या पायाभूत सुविधांच्या स्थितीसाठी जबाबदार धरले जात आहे. पूर्वीच्या कारभारातील त्रुटींचे परिणाम आजही मुंबईला भोगावे लागत असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.
प्रवीण काळे