मुंबईत ठाकरे बंधूंना शरद पवारांची साथ
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची माहिती : शिवसेना ठाकरे, मनसे अणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची आघाडी
मुंबई : प्रतिनिधी
कितीही टीका केली तरी बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर मैत्रीचे नाते अतूट ठेवणारे शरद पवार यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना साथ देणार आहेत. ठाकरे बंधूंच्या युतीत शरद पवार सहभागी झाले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस वगळता महाविकास आघाडी न राहता शिवसेना ठाकरे, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार यांची आघाडी झाली असल्याचे सध्याचे चित्र आहे.
शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या महाविकास आघाडीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत त्यांचे पानिपत झाल्यानंतर काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीत ‘एकला चलो रे‘चा नारा दिला. त्यापूर्वी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे युतीचे वारे वाहू लागले होते. त्यामुळे ठाकरेंबरोबर मनसेची युती काँग्रेसला ऊचणारी नव्हती. त्यामुळे त्यांनी मुंबईत स्वबळ अजमावयाचे ठरविले वंचितबरोबरही चाचपणी केली.
जयंत पाटील -उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा
शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी चर्चा झाली, यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरला. शिवसेनेचे (ठाकरे) यामध्ये थोडे नुकसान झाले पण युतीमध्ये हे होत असते. मात्र शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता आणि त्यांचा पक्ष सोबत असला पाहिजे ही भूमिका आमची होती, असे संजय राऊत म्हणाले.
मुंबईमध्ये शरद पवार यांच्या नेतफत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आमची सकारात्मक चर्चा झाली. उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादीचे (शरद पवार) माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा करत आहेत. त्यांना ज्या जागा हव्या होत्या त्यातल्या बहुतेक जागा त्यांना दिल्या आहेत. त्यामुळे आमच्या युतीत काही अडचण या क्षणी दिसत नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसने आणखी काही जागा मागितल्या आहेत, त्या दुर्दैवाने मनसेच्या कोट्यात गेल्या आहेत. पण तरीही आम्ही त्यांचे (शरद पवार गट) समाधान कऊ शकलो, याची आम्हाला खात्री आहे, असेही राऊत म्हणाले.
पुण्याबाबत एक -दोन दिवसात निर्णय
पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत संजय राऊत म्हणाले की, त्याबद्दल काही माहित नाही. तसा काही निर्णय झाला तर त्यावर बोलता येईल. मात्र आमची महाविकास आघाडी म्हणून तिथे चर्चा सुऊ आहे. एक-दोन दिवसांमध्ये त्या संबंधीचा निर्णय घेतला जाईल.
ठाकरेंच्या मराठी कार्डविरोधात महायुतीचे हिंदुत्वकार्ड
मुंबई महापालिकेत सत्ता राखणे आणि नव्याने ताबा मिळविणे यासाठी ठाकरे बंधू आणि महायुती आटोकाट प्रयत्न करत आहेत. त्यासाठी खास रणतीनी आखण्यात येत आहे. ठाकरे बंधूंचे मराठी कार्ड विरोधात महायुतीचे हिंदुत्व कार्ड असा हा सामना रंगणार आहे. मराठी माणूस या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. मराठी मनावर अजूनही ठाकरेंचा पगडा कायम आहे. हाच मुद्दा हेरून आता महायुतीने त्यावर उतारा म्हणून हिंदुत्वाचा खास फॉर्म्युला आणला आहे.
ठाकरे बंधू आणि त्यांचे साथीदार शरद पवार यांना अटकाव म्हणून आता महायुतीने खास रणनीती आखली आहे. सध्या देशात हिंदुत्वाचे वारे वाहत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीतही तोच मुद्दा इनकॅश करण्यासाठी महायुतीने आता हिंदुत्वाचे कार्ड बाहेर काढले आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मराठी मतांसोबतच हिंदी भाषिक आणि नवमतदारांमध्येही प्रचंड क्रेझ आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवनकल्याण, तर राज्यातले हिंदुत्ववादी नेते आणि मंत्री नितेश राणे, गोपीचंद पडळकर यांच्या सभांची जोरदार मागणी होत आहे. उत्तर भारतीय नेत्यांकडून हिंदुत्ववादी नेत्यांच्या सभेसाठी मागणी वाढली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात अनेक दिग्गज हिंदुत्ववादी नेते मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात प्रचार करताना दिसणार आहेत.
‘बटेंगे तो कटेंगे‘चा प्रचार पॅटर्न
मुंबईसह वसई -विरार, मिरा -भाईंदर, भिवंडी, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, आहिल्यानगर, सोलापूर या सर्वच महानगरपालिकेतील उमेदवारांना मंत्री नितेश राणे यांच्या प्रचारसभा हव्या आहेत. लोकसभा, विधानसभेप्रमाणेच भाजप महायुतीचा ’बटेंगे तो कटेंगे’ प्रचार पॅटर्न असेल. मागच्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या भाषणात हिंदुत्वाशी कसलही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.