वानखेडेवर मुंबईचा दारुण पराभव
आठ सामन्यातील सहावा पराभव : स्पर्धेतून बाहेर जाण्याचे संकट : सनरायझर्स हैदराबादकडून 249 धावांचे टार्गेट चेस : सामनावीर हेन्रिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेडची अर्धशतके
वृत्तसंस्था/मुंबई
सनरायझर्स हैदराबादने वानखेडे मैदानावर अडीचशे पार धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. मुंबईने 243 धावांचा डोंगर उभारला तेव्हा तो पुरेसा ठरेल अशी चिन्हे होती मात्र हैदराबादच्या स्टार फलंदाजांनी हे लक्ष्यही किरकोळ ठरवले. हैदराबादने 18.4 षटकात 6 विकेट्स राखून संस्मरणीय विजय मिळवताना गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. या पराभवामुळे गुणतालिकेत मुंबईच्या संघाची आणखी घसरण झाली असून, प्लेऑफ्सच्या आशा मावळत चालल्या आहेत. 30 चेंडूत नाबाद 65 धावांची खेळी साकारणाऱ्या हेन्रिक क्लासेनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
मुंबईने विजयासाठी दिलेल्या 244 धावांचा पाठलाग करताना ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी मुंबईच्या गोलंदाजीची चांगलीच धुलाई केली. मैदानाच्या सातव्या ओव्हरमध्येच या दोघांनी संघाचे शतक फलकावर नोंदवले. दिग्गजगोलंदाज जसप्रीत बुमराहलाही या जोडीने सोडले नाही. युवा अश्वनी कुमारच्या पहिल्याच ओव्हरमध्ये या दोघांनी 23 धावा कुटल्या. अफगाणिस्तानचा शिलेदार गनफझरने अभिषेक शर्माला बाद करत झंझावात रोखला. अभिषेकने 24 चेंडूत 45 धावांची वेगवान खेळी केली. यात 4 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. दवामुळे दोनदा चेंडू गनफझरच्या हातातून निसटला. यानंतर गनफझरच्या पुढील चेंडूवर इशान किशन त्रिफळाचीत होऊन तंबूत परतला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. हेनरिच क्लासेनने गनफझरची हॅट्ट्रिक होऊ दिली नाही.
क्लासेनची तुफानी फटकेबाजी
यानंतर हार्दिक पंड्याने हेडला बाद करत हैदराबादला वेसण घातली. हेडने 30 चेंडूत 4 चौकार आणि 8 षटकारांसह 76 धावांची वादळी खेळी केली. यानंतर क्लासेनने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारले. सातत्याने चौकार वसूल करत क्लासेनने मुंबईच्या आक्रमणातली हवा काढून टाकली. क्लासेन-नितीश जोडीने 40 चेंडूत 80 धावांची वादळी भागीदारी केली. क्लासेनने 30 चेंडूत 65 धावांची तडाखेबंद खेळी केली. या खेळीत 7 चौकार आणि 4 षटकारांची लयलूट केली. नितीश राणाने त्याला चांगली साथ देत 21 धावांचे योगदान दिले. नितीश बाद झाल्यानंतर सलील अरोराने क्लासेनला चांगली साथ दिली. सलीलने 10 चेंडूत 30 धावांची उपयुक्त खेळी केली. या जोरावर हैदराबादने विजयी टार्गेट 18.4 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.
रिकेल्टनची शतकी खेळी वाया
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने प्रथम फलंदाजीचा धाडसी निर्णय घेतला. विल जॅक्स आणि रिकेल्टन जोडीने डावाची सुरुवात केली. या जोडीने 7.1 ओव्हर्समध्ये 93 धावांची खणखणीत सलामी दिली. ही जोडी जमलेली असताना जॅक्सला 46 धावांवर नितीश रे•ाrने बाद केले. यानंतर आलेला सूर्यानेही निराशा केली. अवघ्या 5 धावा काढून तो माघारी परतला. नमन धीरने 22 धावांची खेळी करत रिकेल्टनला साथ देण्याचा प्रयत्न केला, पण तो मोठी खेळी साकरु शकला नाही. कर्णधार हार्दिक पंड्याने 15 चेंडूत 31 धावांची खेळी साकारली. एका बाजूने सहकारी फलंदाज बाद होत असताना रिकेल्टनने मात्र नाबाद शतक झळकावले. त्याने 55 चेंडूत 10 चौकार आणि 8 षटकारासह नाबाद 123 धावा फटकावल्या. रिकेल्टनच्या या धमाकेदार खेळीच्या जोरावर मुंबईने 20 षटकांत 243 धावा केल्या. पण, हैदराबादने हे टार्गेटही चेस करत मुंबईच्या आशेवर पाणी फिरवले आहे.