मुंबईचा 7 धावांनी रोमांचक विजय
श्रेयस अय्यर, मुशीर खान यांची अर्धशतके, शिवम दुबेचे 4 बळी
वृत्तसंस्था / मुंबई
2025-26 च्या विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात मुंबईने हिमाचल प्रदेशचा 7 धावांनी पराभव करुन पूर्ण गुण वसुल केले. खराब हवामानामुळे हा सामना प्रत्येकी 33 षटकांचा खेळविला गेला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 33 षटकांत 9 बाद 299 धावा जमविल्या. त्यानंतर हिमाचल प्रदेशचा डाव 32.4 षटकांत 292 धावांत आटोपल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला. या सामन्यात मुशीर खान आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांची अर्धशतके वैशिष्ट्यो ठरली. दुखापतीनंतर श्रेयस अय्यरचे शानदार अर्धशतकाने पुनरागमन झाले आहे.
मुंबईच्या डावात मुशीर खानने 51 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकारांसह 73, सरफराज खानने 10 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 21, यशस्वी जयस्वालने 2 चौकारांसह 15 धावा जमविल्या. मुशीर खान आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या गड्यासाठी 82 धावांची भागिदारी केली. सूर्यकुमार यादवने 18 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 24, शिवम दुबेने 15 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 20, हार्दिक तमोरेने 2 चौकारांसह 19, साईराज पाटीलने 9 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 25, मुलानीने 5 चेंडूत 2 चौकारांसह 11 धावा केल्या. श्रेयस अय्यरने 53 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारांसह 82 धावा झळकविल्या. हिमाचल प्रदेशतर्फे वैभव अरोरा आणि अभिषेक कुमार तसेच कुशल पाल यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना हिमाचल प्रदेशच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. संघाचे खाते उघडण्यापूर्वीच त्यांचे दोन सलामीचे फलंदाज बाद झाले. त्यानंतर पुखराज मान आणि बैन्स या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 111 धावांची भागिदारी केली. मानने 41 चेंडूत 3 षटकार आणि 7 चौकारांसह 64, बैन्सने 39 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह 53 धावा केल्या. मयांक डागरने 47 चेंडूत 11 चौकारांसह 64 तर अमनप्रित सिंगने 21 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांसह 42 तसेच अमितकुमारने 20 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 28 धावा जमविल्या. मुंबईतर्फे शिवम दुबेने 68 धावांत 4 तर साईराज पाटीलने 2 तसेच मुलानी, मुशीर खान व तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : मुंबई 33 षटकांत 9 बाद 299 (श्रेयस अय्यर 82, मुशीर खान 73, सरफराज खान 21, सूर्यकुमार यादव 24, साईराज पाटील 25, दुबे 20, वैभव अरोरा, अभिषेक कुमार आणि कुशल पाल प्रत्येकी 3 बळी). हिमाचल प्रदेश 32.4 षटकांत सर्वबाद 292 (पुखराज मान 64, बैन्स 53, मयांक डागर 64, अमनप्रित सिंग 42, अमितकुमार 28, शिवम दुबे 4, साईराज पाटील 2, मुशीर खान, मुलानी व तुषार देशपांडे प्रत्येकी 1 बळी).