For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली; आता मनोज जरांगें यांच्याकडून नवी रणनीती जाहीर

05:46 PM Sep 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली  आता मनोज जरांगें यांच्याकडून नवी रणनीती जाहीर
Advertisement

जालना : मुंबईतील आझाद मैदानावर प्रस्तावित मराठा आंदोलन आणि उपोषणाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाची रणनीती बदलण्याची घोषणा केली आहे. मोठ्या संख्येने आंदोलकांना मुंबईत घेऊन जाण्याऐवजी सुरुवातीला आपण स्वतः चार-पाच सहकाऱ्यांसह मुंबईकडे रवाना होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे कारण देत पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. या निर्णयानंतर अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी बोलताना जरांगे यांनी पुढील रणनीती स्पष्ट केली.

मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत गेल्यास अडचणी निर्माण होणार असतील, तर आपण मोजक्या सहकाऱ्यांसह मुंबईत गेल्यावर काय होणार, असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला. ‘आधी मी एकटा खिंड लढतो,’ असे सांगत मराठा आंदोलनाच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी प्रथम आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

Advertisement

दरम्यान, मुंबईकडे जाण्यासाठी तयार ठेवलेल्या वाहनांचा तसेच जमा केलेल्या वर्गणीचा सध्या वापर करू नये, असे आवाहन त्यांनी मराठा बांधवांना केले. आंदोलनाच्या पुढील टप्प्यासाठी ताकद राखून ठेवणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपल्या आगामी प्रवासाबाबतही जरांगे यांनी माहिती दिली. सलाईन काढल्यानंतर प्रकृतीवर परिणाम जाणवत असून, पुढील पाच-सहा दिवसांचा प्रवास अत्यंत कठीण असणार असल्याचे त्यांनी म्हटले. प्रवासादरम्यान कोणाच्याही घरी मुक्काम न करता चौकातच राहण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

ही शेवटची झुंज असल्याचे सांगत आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण ताकद खर्च न करता ती पुढील लढ्यासाठी राखून ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा संदर्भ देत राखीव ताकद ठेवण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

15 सप्टेंबरला अंतरवाली सराटीतून प्रस्थान

मुंबई पोलिसांनी आझाद मैदानातील उपोषणाला परवानगी नाकारल्यानंतर जरांगे पाटील 15 सप्टेंबर रोजी सकाळी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्यांच्या नियोजित मार्गात पाटोदा, श्रीगोंदा, हडपसर आणि खोपोली या ठिकाणांचा समावेश आहे. 19 सप्टेंबर रोजी मुंबईत पोहोचण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईत प्रवेश करताना पोलिसांकडून अडवणूक केली जाते का, याकडे आता लक्ष लागले आहे. दरम्यान, आपल्याला मुंबईत जाण्यापासून रोखल्यास मोठ्या संख्येने मराठा आंदोलक परवानगीशिवाय मुंबईत दाखल होऊ शकतात, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.

Advertisement
Tags :

.