Mumbai News मुंबईत झाड पडण्याचं सत्र काही थांबेना, आता शिवसेना नेत्याच्या कार्यालयावर पडलं झाड
मुंबईतील चेंबूर येथे स्कूल बसवर झाड कोसळून झालेल्या घटनेत एका ११ वर्षीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला. ही घटना ताजी असताना दोनच दिवसांनी मॅनहोलमध्ये पडल्याने एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दोन्ही घटनानंतर मान्सूननंतर दुर्घटनांचं सत्र सुरुच राहिल्याचं दर्शविणारी अजून एक दुर्घटना समोर आली आहे.
शिवसेना नगरसेविकाच्या घरावर कोसळलं झाड
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यादरम्यान शिवसेना नेते आणि माजी नगरसेवक हारून खान यांच्या घाटकोपर येथील कार्यालयावर एक मोठे झाड कोसळले. झाड उन्मळून पडल्याने कार्यालयाच्या मोठ्या भागाचे नुकसान झाले. चांगली गोष्ट म्हणजे घटनेच्या वेळी कार्यालयात कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे कोणालाही अपाय झाला नाही. या घटनेची माहिती मिळताच, संबंधित विभागाचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी झाड हटवण्यास सुरुवात केली.
या घटनेनंतर, स्थानिक रहिवाशांनी पावसाळ्यात जीर्ण आणि धोकादायक झाडांची वेळेवर छाटणी व देखरेख करण्याची मागणी केली आहे. रविवारी सकाळी सुमारे ११ वाजता घाटकोपर पश्चिममधील अमृतनगर येथील रामनगर ट्रान्झिट कॅम्पमधील सिंहगड सोसायटीत एक मोठे वडाचे झाड अचानक कोसळले. गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे झाडाची मुळे कमकुवत झाल्याने हा अपघात घडला. सुदैवाने, घटनेच्या वेळी झाडाजवळ कोणीही उपस्थित नव्हते, त्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत टळली.