‘मुंबई’ आता आशियातील अब्जाधीशांची राजधानी
वर्षात 26 अब्जाधीशांची संख्या वाढली : बीजिंगलाही मागे टाकत मुंबई प्रथमच या स्थानी
वृत्तसंस्था/ मुंबई
भारताची आर्थिक राजधानी मुंबई आशियातील अब्जाधीशांची राजधानी बनली आहे. चीनची राजधानी बीजिंगला मागे टाकत मुंबईने प्रथमच हे स्थान मिळवले आहे. मुंबईत 603 चौरस किलोमीटर परिसरात 92 अब्जाधीश राहतात, तर बीजिंगच्या 16,000 चौरस किलोमीटर परिसरात 91 अब्जाधीश आहेत.
‘हुरुन रिसर्चच्या 2024 ग्लोबल रिच लिस्ट’ नुसार, गेल्या एका वर्षात मुंबईत 26 जण नव्याने अब्जाधीश झाले आहेत, तर बीजिंगमध्ये या काळात 18 लोक या यादीतून बाहेर पडले आहेत. चीनमध्ये 814 अब्जाधीश आहेत, तर भारतात 271 अब्जाधीश आहेत.
#SOCI
मुंबई आता जागतिक स्तरावर तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. न्यूयॉर्क पहिल्या स्थानावर आहे, येथे 119 अब्जाधीश राहतात, तर लंडन दुसऱ्या स्थानावर आहे, जिथे 97 लोक अब्जाधीश आहेत. ज्यांच्याकडे 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती आहे, म्हणजेच सुमारे 8,333 कोटी रुपये. 92 लोकांकडे 445 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. अहवालानुसार, मुंबईतील एकूण 92 लोकांची संपत्ती एका वर्षात 47 टक्क्यांनी वाढून 445 अब्ज डॉलर्स (37.09 लाख कोटी रुपये) झाली आहे.
त्याच वेळी, चीनच्या राजधानीतील अब्जाधीशांची संपत्ती 28 टक्केने घटून 265 अब्ज डॉलर (22.08 लाख कोटी रुपये) झाली आहे. जगातील टॉप 20 श्रीमंतांमध्ये फक्त 2 भारतीय आहेत. भारतात सध्या 271 अब्जाधीश आहेत. पण, जगातील टॉप 20 श्रीमंतांमध्ये फक्त दोन भारतीय आहेत. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी 9.43 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह 11 व्या क्रमांकावर आहेत. त्याचवेळी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी या यादीत 18 व्या क्रमांकावर आहेत, त्यांच्याकडे 6.73 लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. मुकेश अंबानी टॉप टेन सर्वात श्रीमंत लोकांमध्ये सामील झाले आहेत.